आपल्या प्रजेला सुखात ठेवणारा महासम्राट बळीराजा प्रजेचे सुख पहायला यावा म्हणून साजरा केला जाणारा बलिप्रतिपदा हा सण भारताच्या मुख्यप्रवाहाचा सांस्कृतिक वारसा आहे.
इडा पिडा जावो,
बळीचे राज्य येवो,
म्हणत बळीराजाचे स्मरण, या दिवाळी महोत्सवाच्या पर्वावर, हजारो वर्षे करण्याची, शुभेच्छा देण्याची ही तऱ्हा लोकांनी जतन करून ठेवली. सिंधुजन दीपोत्सव, बलिप्रतिपदा, भाऊबीज सणाच्या सोबतच आता बळीराजा महोत्सव मोठ्या आनंदाने सर्वत्र साजरा करत आहेत.
बलिप्रतिपदेच्या दिवशी दिनांक १४ ऑक्टोबर २०२३ ला चेतना फिजिओथेरपी कॉलेज, वैभव नगरी, शांती नगर चौक, वायफड रोड, उमरी (मेघे) वर्धा येथे साजरा करण्यात आला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी शेतकरी नेते तथा जिल्हा परिषद सदस्य मा. मनोज चांदूरकर मार्गदर्शक बाबा बिडकर, अनुज हुलके यांच्या सह डॉ.अशोक चोपडे, नरेंद्र पहाडे प्रामुख्याने उपस्थित होते. शाहीर संजय भगत यांच्या क्रांतीगितगायनाने सांस्कृतिक वातावरण निर्मिती झाली. प्रास्ताविकातून डॉ. अशोक चोपडे यांनी बळीराजा महोत्सव आयोजित करण्याची पार्श्वभूमी विशद केली. महात्मा फुले यांनी इतिहासाच्या पुनर्मांडणीचे सूत्र दिले आणि आपली अब्राम्हणी ऐतिहासिक परंपरा शोधण्याची दृष्टी त्यामुळे मिळाली. बळीराजा, खंडोबा, भैरोबा, म्हसोबा, दैत्य, दानव, मरीमाय, मातामाय, आईमाय इ. कुलदैवतं, लोकदैवतं आजही लोकांच्या अंतकरणात खोलवर रुजलेली आहेत. आज समस्त परिवर्तनवादी चळवळीत या सांस्कृतिक वारशाचा धागा पकडून वर्तमानातील विषम प्रवृत्तीला शह देण्यासाठी आगेकूच करत आहेत, हे आपण समजून घेतले पाहिजे, असे ते म्हणाले. बाबा बिडकर यांनी बळीराजा महोत्सव आयोजित करण्याचे औचित्य सांगत असताना बळीराजाची संस्कृती हीच आपली कष्टकरी शेतकरी श्रमजीवी जनसमुदायाची लोकसंस्कृती होय. तमाम सण समारंभ उत्सव साजरा करण्याची परंपरा लोकसंस्कृतीचाच भाग होय. म्हणूनच वैदिकांनी सणांचे कितीही ब्राम्हणीकरण करण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना या संस्कृतीला नष्ट करता आले नाही.आजही आमचे लोक सण साजरे करताना त्यात वेगळेपण दिसून येते.मात्र प्रत्येक सण-उत्सवांचे सिंधुजनांच्या सांस्कृतिक प्रतीकांचे विकृतीकरण करून इतिहासच कुरुप, उलट करून टाकला. बळीराजा महोत्सव आणि इतरही सण साजरे करत असताना अब्राम्हणी संदर्भ प्रकर्षाने समोर आले पाहिजेत.बळीच्या तीन पावलं दानाचा अर्थ, यज्ञयागादी कर्मकांड, वेदप्रामान्य आणि चिकित्सा न करण्याचे, त्यासाठी अविद्या मान्य करणे होय.हे वामनाने कपटाने केले अर्थात,गुलाम सिंधुजनांना बळी जनांना गुलाम केले.असे ते म्हणाले. अनुज हुलके म्हणाले,अलीकडे अशा प्रकारच्या बळीराजा महोत्सवातून सिंधुजनांच्या संस्कृतीचा वारसा उजागर होत असून ब्राम्हणेतर समाजात आत्मभान येत आहे. महात्मा फुले यांनी लिहिलेल्या दस्युचा पोवाडा आणि बळीराजा अखंड आपल्याला मूळ बळी संस्कृतीकडे जाण्यास मार्गदर्शक ठरतात. बळीराजा पूर्वीचे शंभर, जालंधर, विश्वकर्मा, मय, हिरणाक्ष्य हे राजे संपन्न समृद्ध सिंधूसंस्कृतीचे निर्माते होते.त्या समतावादी संस्कृतीला नष्ट करून विषमतावादी वर्णजातव्यवस्था धूर्त आर्यभटांनी प्रस्थापित केली. आणि या देशातील मूळ रहिवासी असलेल्या ब्राम्हणेतर समाजाला गुलाम केले. बळीराजा पूर्व, नंतरचे आणि आजचे सांस्कृतिक समतावादी लढे लढणारे बळीराजाचे वंशज होत. हे बळीराजा महोत्सव साजरा करताना समजून घ्यावे लागेल. समारोपाला अनुज हुलके व बाबा बिडकर यांनी बळीराजाचे अखंड गायन केले. आभार प्रदर्शन सुनील ढाले,यांनी तर निटनेटके सूत्रसंचालन संगीता बढे यांनी केले. प्रा जनार्दन देवतळे, प्रा दत्तानंद इंगोले, प्रफुल्ल गुल्हाने,कपिल थुटे, मिराताई इंगोले,गजानन सोरते, पारस बुरांडे, दत्तानंद इंगोले,धम्मपाल ताकसांडे,मिलींद जुनघरे,संजय भगत,मनोहर डांगे, नंदकुमार वानखेडे,अॅड.भास्कर नेवारे, विलास भगत, भोजराज नगराळे आणि फिजिओथेरपी कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते.
- अनुज हुलके
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Periyar, Bahujan