शेळगाव : आरक्षणाच्या मुद्दावरून जातीय तेढ निर्माण करत ओबीसी नेते मंत्री छगन भुजबळ यांना प्रत्येक सभेत 'टार्गेट' करत शिवराळ भाषेत टीका केली जात असून भुजबळांना यांना डिवचण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा 'जशास तसे' उत्तर दिले जाईल असा इशारा इंदापूर तालुका ओबीसी बांधवांच्या वतीने मराठा समाज आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना देण्यात आला.
शेळगाव (ता. इंदापूर) येथे गुरुवारी (दि. २३) रोजी ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्याविरोधात 'सोशल मीडिया'वर अश्लील कॉमेंटच्या निषेधार्थ ओबीसी बांधवांच्या वतीने मेणबत्ती मोर्चाचे आयोजन करण्यात आले. या वेळी ओबीसी समाजबांधवांनी हा इशारा दिला आहे, या वेळी 'एकच पर्व ओबीसी सर्व', 'भुजबळ साहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है', 'ओबीसी एकजुटीचा विजय असो' या घोषणांनी शेळगाव परिसर दणाणून गेला. शिवाय सध्या कुणबीचे दाखले बोगस पद्धतीने देण्याचे काम बंद करून सरकारला वेठीस धरण्याचे बंद करा, असे आव्हानदेखील जरांगे यांना देण्यात आले.
अॅड. कृष्णाजी यादव, मोहन दुधाळ, भजनदास पवार, विठ्ठल शिंगाडे, राहुल जाधव, अमर बोराटे, किरण म्हेत्रे, संतोष गदादेसह इतरांनी यावेळी मनोज जरांगे-पाटील यांच्यावर टीका करून इशारा दिला. यावेळी देवराज जाधव, दत्तात्रय शेंडे, वसंत मोहोळकर, माऊली बनकर, संतोष राजगुरू, बापूराव दुधाळ, शिवाजी शिंगाडे, मनोहर शिंगाडे, माणिक भोंग, शुभम शिंगाडे, रतन ननवरे यांच्या सह मोठ्या संख्येने ओबीसी समाजबांधव मोर्चात सहभागी झाले होतो. मोहन दुधाळ यांनी सूत्रसंचालन केले.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission