- प्रा. श्रावण देवरे
17 नोव्हेंबरची अंबड येथे संपन्न झालेली ओबीसींची महाकाय सभा ही ओबीसी चळवळीच्या इतिहासातील सुवर्ण पान बनलेली आहे. या महाकाय सभेचे जे काही अनेक पडसाद उमटले आहेत, त्यांचीही नोंद इतिहासात झाल्याशिवाय राहणार नाही. या क्रांती-सभेने अनेक प्रस्थापितांना झटके, फटके व धक्के दिलेले आहेत, ते इतके जबरदस्त आहेत की, त्यातून सावरायला त्यांना महिने लागतील.
या क्रांती सभेची सर्वात मोठी फलश्रुती ही आहे की, मराठ्यांच्या गुंडगिरीची दहशत चुटकीसरशी नष्ट झाली. 30 ऑक्टोंबर रोजी बीड व इतर ठिकाणी मराठा गुंडांनी जो रानटी हैदोस घालून दहशत माजवली होती, त्या मराठा-गुंडागर्दीला ओबीसींनी लोकशाही मार्गाने उत्तर दिले. जाळपोळ, तोडफोड व हिंसाचार माजवून मराठा गुंडांनी संपूर्ण महाराष्ट्रालाच वेठीस धरले होते. शहरांपासून गाव-खेड्यापर्यंतचे ओबीसी नेते व ओबीसी कार्यकर्ते भयभीत झाले होते. सरकार-पुरस्कृत गुंडगिरी असल्याने ती जास्त भयानक होती. वाणी मुकी झाली, लेखणी कंपीत झाली व मनःशांती ढळली, अशी पराभूत मानसिकता निर्माण झालेली होती. अशा सून्न वातावरणात माननीय नामदार भुजबळसाहेबांनी डरकाळी फोडली आणी खेड्या-पाड्यातून व गल्ली-बोळातून भुजबळांच्या डरकाळीला प्रतिसाद देत ओबीसी कार्यकर्ता निर्भीड बनून अंबडची वाट चालू लागला.
सभेचा उत्साह इतका दांडगा होता की, एक दिवस आधीपासूनच लोकांची रिघ अंबडकडे येण्यासाठी सुरू झाली होती. पिवळे झेंडे, पिवळे फेटे, पिवळे गमछे आणी त्यासोबत जय ओबीसीचा नारा दुमदुमत होता! सर्व अंबड व परिसरातील गावे ओबीसीमय झालेली होती. चार चाकी गाड्यांपेक्षा सायकली आणी मोटार सायकलींचीच जास्त रेलचेल होती. अनेक ओबीसी कार्यकर्ते पायीच मोर्चा काढून अंबड गाठत होते. रस्त्याने दुतर्फा पिवळा सागर जणू उसळला होता.
100 एकर जागेतील ही सभा केवळ शंभर एकरपुरती मर्यादित राहीली नाही. जेवढे लोक प्रत्यक्ष स्टेजसमोरील मैदानात जमीनीवर बसले होते, त्यापेक्षा जास्त लोक सभेच्या बाहेरील रस्त्यांवर फतकल मारून बसले होते. एवढा मोठा जनसागर जमलेला असूनही कुठेही कोणाची काही एक तक्रार नव्हती. कोणाच्याही घरासमोर वा रस्त्यावर वाहने लावून कोंडी केलेली नव्हती. पार्कींगची इतकी सुंदर व्यवस्था दुसरीकडे अजून मला पाहायला मिळाली नाही. अर्थात याचे श्रेय जसे संयोजकांना जाते, तेव्हढेच श्रेय पोलीसांनाही द्यावे लागेल. कुणीही कार्यकर्ता वा नेता पोलीसांशी हुज्जत घालतांना दिसला नाही. पोलीसांना शिट्ट्या फुंकण्याची फारशी गरज वाटत नव्हती व कुठे दंडुका उगारण्याची वेळही पोलीसांवर आली नाही. पोलीसांनी फक्त हाताने ईशारा केला की लोक त्यांच्या ईशार्याप्रमाणे वागत होते.
बहुतेक सर्वच वक्त्यांची भाषणे आटोपशीर, मुद्देसूद व संयमीत भाषेत व संवैधानिक चौकटीत झालीत. कुठेही आक्रस्ताळेपणा नाही, शीवीगाळ नाही, अपशब्द नाही, पण तरीही त्यातून उर्जा भरभरून वाहत होती. सभा सुरू होण्याआधी शाहीर सचिन माळी व शाहीर शितल साठे यांनी क्रांती गीते सादर करून सभेत विद्रोहाची ज्योत पाजळत ठेवली होती. सभेतील वक्त्यांच्या भाषणांना श्रोत्यांमधून कधी टाळ्यांच्या गजरात तर कधी मोठमोठ्याने ओरडून प्रतिसाद मिळत होता. कधी हास्याची लहरही उसळत होती.
सभेतील एक महत्वाचे निरीक्षण येथे नोंद करून ठेवणे आवश्यक वाटते आहे. दोन वक्त्यांनी आपल्या भाषणात ‘मोदी-किर्तन’ व ‘फडणवीस-भजन’ सुरू केल्यानंतर श्रोत्यांमधून त्याला थंड प्रतिसाद मिळत होता. श्रोते ओबीसी असल्यामुळे त्यांच्यात सभेचे मॅनर्स पाळण्याइतकी अक्कल निश्चितच होती. त्यामुळे श्रोत्यांना न आवडलेला ‘मोदी-फडणवीस’ उल्लेख हुर्रेबाजी न करता त्यांनी शांतपणे ऐकूण घेतला. ही बाब संयोजकांच्या लक्षात आली. सभेचे सूत्रसंचलन करणारे प्रा. सत्संग मुंडे हे ‘‘श्रावण देवरे स्कूल’’ मधून तयार झालेले कार्यकर्ते असल्याने त्यांना हा प्रकार सहन झाला नाही. त्यांनी पुढच्या वक्त्याचे नाव पुकारण्याआधी सर्वच वक्त्यांना स्पष्ट शब्दात खडसावले की, ‘हा कार्यक्रम ओबीसींचा आहे. आपला पक्ष व आपल्या पक्षाच्या नेत्याचे गुणगान करण्यासाठी हा कार्यक्रम नाही. ओबीसींच्या प्रश्नावरच बोलावे.’’
बहुजन समाजातील जे लोक आमदार, खासदार, नगरसेवक वगैरे झालेत की ते स्वतःला सर्वज्ञ समजायला लागतात व भाषणात काहीही बरळतात. वैचारिक मुद्दे मांडण्यापेक्षा त्यांना आपल्या नेत्यांची आरती ओवाळणे जास्त महत्वाचे वाटते. अशा उच्चपदांवर जाऊन बसलेल्या खुळचट लोकांना जाहीर सभेत खडसावणे व त्यांना शिस्त लावणे महाकठीण काम होय! परंतू सत्संग मुंडे यांनी ते मोठ्या हिंमतीने केले, या बद्दल त्याचे कौतुक केले पाहिजे.
या सभेचे काय काय राजकीय पडसाद उमटले, ते किती दुरगामी परिणाम करणारे ठरतील व ओबीसींच्या पुढच्या भवितव्याची दिशा काय असू शकते, याची चर्चा आपण या लेखाच्या उत्तरार्धात आपण करू या!
तो पर्यंत जयजोती! जयभीम!! सत्य की जय हो!!!.
- प्रा. श्रावण देवरे, संस्थापक-अध्यक्ष, ओबीसी राजकीय आघाडी, संपर्कः 94 227 88 546 ईमेलः obcparty@gmail.com
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission