- प्रा. श्रावण देवरे
लेखाच्या पुर्वार्धात आपण पाहिले की, पॅलेस्टीन-इस्रायल युद्धात बलाढ्य महाशक्ती अमेरिकेचा हात आहे. पॅलिस्टीन नागरिक अस्तित्वासाठी जीवानिशी लढत आहेत. इस्रायल आपला विस्तार करण्यासाठी, आपल्या मालकाला खूश करण्यासाठी व जागतिक लुटीतील हिस्सा वाढविण्यासाठी लढत आहे. अमेरिका आपले जागतिक वर्चस्व वाढविण्यासाठी या युद्धा त हस्तक्षेप करीत आहे.
याची तुलना भारतात सुरू असलेल्या जातीयुद्धाशी केली तर काय दिसते? स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय संविधान बनवितांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जातीयुद्धाची पुनर्रचना केली. सामंती काळातील मैदानी जाती-युद्धाला भांडवली लोकशाहीच्या नव्या साच्यात बसविणे आवश्यक होते, ते काम बाबासाहेबांनी लिलया केले. प्रत्येक जाती-जमातीचं सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय साम्य-असाम्यता अभ्यासून बाबासाहेबांनी त्यांचे चार भागात वर्गीकरण केले. आदिवासी (ST), दलित (SC), ओबीसी (SEBC) व ओपन (Open). या चार कॅटेगिरींची जातीव्यवस्थेतील भुमिका सांगतांना ‘राईटिंग्ज ऍन्ड स्पीचेसच्या’ 5 व्या खंडात पान-112 वर बाबासाहेब लिहीतात की, ‘ओपन कॅटेगिरीत ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य वर्णातून निघालेल्या जाती येतात. ब्राह्मण वर्णातून ब्राह्मण जात, क्षत्रिय वर्णातून मराठा, जाट, पटेल, ठाकूर जमीनदार-सत्ताधारी जाती व वैश्य वर्णातून बनिया जाती आल्यात. या जाती जातीव्यवस्थेच्या लाभार्थी असल्याने त्या जातीव्यवस्थेचे कट्टर समर्थन करतात, असे बाबासाहेब सांगतात. बाकी इतर तीन कॅटेगिरीत कष्टकरी शेतकरी जाती (कुणबी, माळी, तेली ई.), भटके-विमुक्त, अस्पृश्य-दलित जाती व आदवासी जाती-जमाती या जातीव्यवस्थेने पिडीत-शोषित असल्याने स्वाभाविकपणे जातीविरोधी आहेत.
सामंती काळात मैदानी युद्धात कनिष्ठ जातींचे दमन करण्यासाठी सशस्त्र गुंडांच्या टोळ्या वापरल्या जात होत्या. युपीमधील जमीनदारांची करणीसेना व बिहारमधील जमीनदारांची रणवीर सेना हे त्याचे आधुनिक स्वरूप आहे. परंतू लोकशाही काळात या जातीयुद्धाचे स्वरूप बदलले. कनिष्ठ जातीना सत्तेत वाटा मिळविण्यासाठी आरक्षण व निवडणूकांचा मोठा मार्ग मिळाला. 1994 पासून दलित, आदिवासी व ओबीसींना राजकीय आरक्षण मिळायला लागले. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधून मोठ्या प्रमाणात ओबीसी नेते निर्माण व्हायला लागलेत. हे ओबीसीनेते आज ना उद्या विधानसभेत व लोकसभेत पोहचतील व राज्यातील मराठ्यांची सत्ता खतम करतील, ही रास्त भीती त्यांच्या मनात घर करुन बसली आहे. त्यामुळे मराठ्यांना ओबीसींच्या राजकीय आरक्षणात आक्रमण करून आपल्या सत्तेचा विस्तार करायचा आहे.
ओबीसींच्या आरक्षणात आक्रमकपणे घुसखोरी करण्याचा मनसुबा मराठ्यांचा मनात 1994 पासूनच आहे. दरम्यानच्या काळात अनेक मराठा मुख्यमंत्री आलेत, परंतू त्याकाळात त्यांना एकही मोर्चा काढता आला नाही. मात्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्याबरोबर लगेच मराठ्यांचे लाखांचे मोर्चे निघायला लागलेत. याचे साधे कारण हे आहे की, मराठ्यांना व एकूणच भारतातील जमीनदार-क्षत्रिय जातींना ब्राह्मणांनी पाठीमागून ‘पूश’ दिल्याशिवाय त्यांना लढण्याचे बळ प्राप्त होत नाही.
ज्यु लोकांना पॅलिस्टीनींच्या भु-प्रदेशावर आपला स्वतःचा देश निर्माण करायचा होता, मात्र त्यांनी सुरूवतीला फकत् जमीनी विकत घेऊन सहअस्तित्वाची भीख मागीतली व उदार पॅलेस्टीनींनी त्यांना ती भीख दिली. त्याचप्रमाणे मराठ्यांना ओबीसी आरक्षणात येऊन आपल्या सत्तेचा विस्तार करायचा होता, मात्र त्यांनी सुरूवातीला स्वतंत्र मराठा आरक्षणाची मागणी केली. त्यांच्या या मागणीला उदार दलित+ओबीसींनी पाठींबा दिला. त्यानंतर त्यांनी ओबीसींना धक्का न लावता ओबीसी आरक्षण मागीतले व फडणवीसांनी असे आरक्षण 2018 साली दिले. हे आरक्षण गैरमार्गाने देण्यात आलेले असल्याने सुप्रिम कोर्टात टिकले नाही. सुप्रिम कोर्टाने 5 मे 2021 रोजी निकाल देऊन मराठा आरक्षण नाकारले, त्यावेळी फडणवीस सत्तेत नसल्याने मराठा शांत बसले. परंतू खोके देउन आमदार विकत घेऊन फडणवीस पुन्हा सत्तेत आले व फडणवीसांच्या पाठींब्याने मराठ्यांनी पुन्हा उचल खाल्ली. फडणवीसांनी जरांगेंच्या नावाने "मराठा विरूद्ध ओबीसी युद्धाची स्क्रिप्ट" लिहून ती अमलात आणली व युद्ध पेटले. आता या युद्धात ओबीसींना पॅलेस्टीनींप्रमाणे स्वतःचे अस्तित्व टिकविण्यासाठी लढावेच लागणार आहे. लढाईसाठी त्यांच्याजवळ हे एकमेव कारण आहे. परंतू मराठ्यांना या युद्धात लढण्यासाठी इस्रायलप्रमाणे तीन कारणे आहेत. 1) त्यांना त्यांच्या सत्तेचा विस्तार करायाचा आहे व तो विस्तार ओबीसींचे आरक्षण बळकावूनच होऊ शकतो. 2) या लढाईत मराठ्यांचे मालक ब्राह्मण आहेत, त्यांना खूश करण्यासाठी मराठ्यांना ओबीसींच्याविरोधात लढावेच लागते आहे. 3) ओबीसींच्या विरोधात जितक्या जास्त प्रमाणात मराठा लढतील तेवढ्या प्रमाणात मराठ्यांना सत्तेतील हिस्सा मिळेल. ओबीसी विरुद्ध मराठा जातीयुद्धात ब्राह्मणांचा काय फायदा? बहुजन जातीत आपसात जितक्या जास्त मारामार्या होतील, तेवढी ब्राह्मणांची वर्चस्वाची मक्तेदारी वाढते. त्यामुळे ब्राह्मण मुख्यमंत्री होताच ओबीसीवरुद्ध मराठा युद्ध पेटले.
आता आपण पुन्हा ज्यु लोकांकडे जाउ या! ज्यु लोकांना सर्वात जास्त त्रास ख्रिश्चनांनी दिला आहे. ख्रिश्चनांनी अनेकवेळा ज्युंचे शिरकाण केले आहे व हत्याकांड केले आहे. तरीही ज्यु लोकांनी ख्रिस्चन अमेरिकाच्या पाठींब्याने स्वःताचे राष्ट्र स्थापन केले. मराठ्यांनी आज ब्राह्मणांचा पाठींबा घेऊन ओबीसींचे हक्क लुटले असतील! परंतू या ब्राह्मणांनी मराठ्यांचे क्षत्रिय म्हणून अनेकवेळा शिरकाण केले आहे. ब्राह्मण परशूरामने 21 वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली तेव्हा क्षत्रियांचे शिरकाणच झाले. पृथ्वीवरून क्षत्रिय नष्ट झाले की, ब्राह्मण क्षत्रिय बायका-पोरींसोबत समागम करून पुन्हा क्षत्रियांना पैदा करीत होते व पुन्हा त्यांच्या कत्तली करुन त्यांना नष्ट करीत होते. असे 21 वेळा झाले, म्हणून ब्राह्मणांनी 21 वेळा पृथ्वी निःक्षत्रिय केली असे खुद्द ब्राह्मणांनीच लिहून ठेवले आहे.
डॉ. बाबासाहेबांनी सांगीतल्याप्रमाणे ओपन कॅटेगिरीतील ब्राह्मण+मराठे हे जातीव्यवस्थेचे समर्थक आहेत. म्हणून ते सत्तेचा वापर जातीव्यवस्था मजबूत करण्यासाठी करतात. परंतू दुसर्या कॅटेगिरीतील ओबीसी हे स्वाभाविकपणे जातीविरोधी असल्याने ते सत्तेत पोहचल्यावर सत्तेचा वापर जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठीच करतात, हे स्टॅलिन, लालू, मुलायम व नितीश (स्टॅ.ला.मु.नि.) यांनी सिद्ध केले आहे. भावी काळात ओबीसी आरक्षणातून महाराष्ट्रातही प्रामाणिक ओबीसी नेता (स्टॅ.ला.मु.नि. प्रमाणे) निर्माण होऊ शकतो व तो ब्राह्मण+मराठ्यांची सत्ता नष्ट करू शकतो, या रास्त भीतीपोटी मराठ्यांना चिथावणी देऊन ब्राह्मण-फडणवीसांनी ओबीसींच्या विरोधात जाती-युद्ध पेटविले आहे.
कम्युनिस्ट, समाजवादी, आंबेडकरवादी वगैरे लोकांमध्ये जरांगेंना पाठींबा देण्याची चढाओढ सुरू आहे, या क्रांतिकारक म्हणविणार्या लोकांनी ओबीसी-मराठा संघर्षमागील ब्राह्मणी षडयंत्र समजून घेतले तर, त्यांचा क्रांतिकारकपणा उताणा पडल्याशिवाय राहणार नाही.
जयजोती! जयभीम!! सत्य की जय हो !!!
- प्रा. श्रावण देवरे, संस्थापक-अध्यक्ष, ओबीसी राजकीय आघाडी, संपर्कः 94 227 88 546, ईमेलः obcparty@gmail.com
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission