सिंधुसंस्कृतीचा पुरस्कर्ता, विश्वसम्राट, कृषिसम्राट बळीराजा गौरव मिरवणुक - वर्ष २० वे बळीराजा गौरव मिरवणुक, दि. १४ नोव्हेंबर २०२३, स्थळ: म. फुलेवाडा ते लाल महाल, स. १० वा
सत्यशोधकांच्या पुढाकारातून पुण्यात म.फुले वाड्यापासून छ. शिवरायांच्या लाल महालापर्यंत बलिप्रतिपदेच्या दिवशी सिंधुसंस्कृती सम्राट बळीराजाची गौरव मिरवणुक काढण्यात येते. मिरवणुकीचे यंदाचे २० वे वर्ष आहे. देशात लोकशाही धोक्यात आली आहे. यंदाच्या वर्षी महाराष्ट्रावर दुष्काळाचे भयानक संकट ओढावले आहे. राज्यात ७० टके भागात पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे. पिण्याच्या पाण्याची परिस्थिती आजच गंभीर आहे. शेतकऱ्यांना तातडीने पाणी, रोजगार व शिक्षण यासंदर्भात तातडीने मदत करणे आवश्यक असताना महाराष्ट्र सरकार दुष्काळी, दुष्काळसदृश्य परिस्थिती असे शाब्दिक घोळ घालून उपाययोजनांना उशीर करत आहे. विदर्भ, मराठवाड्यासह सर्वत्र शेतकरी कर्जबळी ठरत आहेत. शेतकरी बहिणभावांनी गळफास झुगारून द्यावा आणि लढण्या व आत्मसन्मानाने जगण्यासाठी बळीराजाकडून प्रेरणा घेतली पाहिजे. हाच संदेश महाराष्ट्रातील कष्टकरी जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी बळीराजा गौरव मिरवणुक ऐतिहासिक व प्रेरणादायी ठरणार आहे. इतिहास हा दंग्याधोप्याचे हत्यार नाही तर जगण्यासाठीचे प्रेरणास्थान असावा म्हणूनच आपण बळीराजाचा खरा इतिहास जाणून घेतला पाहिजे. बळीराजाचा इतिहास मायभगिनींनी 'इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो' या म्हणीतून जपून ठेवला आहे. जो इतिहास संत तुकाराम महाराज व म. फुले यांनी पुन्हापुन्हा समजावुन सांगितला आहे. राजमाता जिजाऊंनी शिवबांना हाच इतिहास सांगून बळीराज्याची पुनर्स्थापना करणारे स्वराज्य उभारण्याची शिकवण दिली. कपटकारस्थाने व द्वेषातून नव्हे तर मानवतेच्या पायावर राष्ट्र निर्मिती होते, हा धडा आजही गिरवला पाहिजे.
आज बलिप्रतिपदा। म्हणजे बळीराजाचे स्मरण आणि गौरव करण्याचा दिवस. कारण सम्राट बळीराजा हा बहुजन समाजाचा श्रेष्ठ पूर्वज होता. बळीराजाने सिंधुसंस्कृतीचे जतन-संवर्धन केले. स्त्रीसत्तेच्या इतिहासाला जागे ठेवले. प्रत्येक श्रम करणाऱ्या माणसाला बळीराज्यात प्रतिष्ठा होती. तो समतेने आणि ममतेने वागण्याबद्दल प्रसिध्द होता. त्याने बहुजन समाजाला ताठ मानेने, स्वाभिमानाने जगायला शिकविले. बळीराजाने श्रम संस्कृतीचा नेहमीच पुकारा केला. सर्व प्रजेला समान मानण्याचे धोरण बाळगले होते. तो सर्व प्रजेची काळजी घेत असे. तो सर्व दृष्टीने उदार होता. सत्यवचनी, विनयशील, शूर, धाडसी, न्यायी आणि सद्गुणी होता. विषमतावाद्यांच्या विरोधात त्याने अनेक युध्दे जिंकली. महाबळीराजाचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तो संविभागी होता. संविभागी म्हणजे न्याय्य असे विभाग करुन देणारा. म्हणजेच ज्याचा हिस्सा त्याला देणारा राजा. संपत्तीची वाटणी करण्याची ही प्रेरणा बळीराजाकडे स्त्रीसत्ते कडून आलेली आहे. निकती ही स्त्रीसत्तेची आद्य राणी होती. ही गणमाता आपल्या गणातील सदस्यांमध्ये नृत्य करत फासे फेकुन कृषिधनाचे व जमिनीचे वाटप करीत असे. याच न्यायाने तो आपल्या स्त्रीसत्ताक पूर्वजांप्रमाणेच न्याय्य वाटपाचे धोरण प्रत्यक्ष राबवताना दिसतो. निर्ऋती या आद्य स्त्रीसत्तेच्या राणीने सुरु केलेले धोरण बळीराजा अस्तित्वात आणू पहात होता. स्त्रीसत्तेशी विचार व कृतीच्या संदर्भात नाळ जोडू पाहत होता. निक्रतीप्रणीत स्त्रीराज्याकडे बळीराजाचा ओढा होता. समतेची जनक निर्ऋती ही गणमाता असल्याने बळीराजाने तिच्यासारखे राज्य उभे करण्याचा प्रयत्न केला होता.
आधुनिक कालखंडात म. फुले यांनी बळीराजा सद्गुणांचा पुतळा होता असे म्हंटले आहे. बलिस्थानात शूर असे भैरोबा, खंडोबा, जोतीबा, म्हसोबा इ. होते म्हणूनच स्त्रिया 'इडा पिडा टळो, बळीचे राज्य येवो' अशी आकांक्षा करतात. परंतु धुर्त आर्यभटांनी मात्र बळीला रसातळाला नेले असे स्पष्ट करतात. संत तुकाराम महाराजांनी बळीराजाचा महिमा आपल्या अभंगातून गायिला आहे, 'बळी सर्वस्वे उदार' असे बळीराजाचे वर्णन केले आणि वामनहरीने जुलुम करुन त्याला पाताळात का घातले याबद्दल आपला आक्षेपही नोंदविला आहे. संत जनाबाई सुध्दा बळीराजाचा गौरव करतात. बळीराजा मराठी भाषिक स्त्रियांनी म्हणीच्या स्वरुपात जतन करुन ठेवला आहे, तसाच मळ्याळम् लोकगीतातुनही कष्टकरी बहुजनांनही आठवण जतन केली आहे. या लोकगीतांचा भावार्थ बळीराज्यात आदर्श स्वरुपाची समता होती असा आहे. केरळ मध्ये ओणम सणाच्या दिवशी गावोगावी तरुण महाबळीचे रुप धारण करून प्रत्येक घरापुढे जाऊन प्रजेची विचारपुस हा प्रतिबळीराजा करतो. बळीराजाचे स्मरण तामिळनाडूतही केले जाते. प्रत्येकाने आपल्या हृदयासनावर प्रेम मंत्रांनी अभिषिक्त केलेला आणि सम्यक राज्यकर्ता असलेला सम्राट हजोरो वर्षे याचा पुनरागमनाची प्रतिक्षा केली जात आहे. आपला बळीराजा येत आहे त्याचे स्मरण करत नवा वामनावतार गाडून कृषिसम्राट बळीराजाचे राज्य आणण्यासाठी कटिबध्द होऊयात. सत्य की जय हो !
विश्वसम्राट बळीराजा गौरव समिती - प्रा. प्रतिमा परदेशी, रमेश राक्षे, सागर आल्हाट, रघुनाथ ढोक, संतोष शिंदे, राजेंद्र शेलार, व्ही. जे. वळवी, ॲड.मोहन वाडेकर, अंकल सोनावणे, सचिन बगाडे, महेश बनकर, प्राची दुधाणे, विठ्ठल सातव, मारुती जाधव, किशोर ढमाले, दत्ता पाकिरे, महेंद्र जाधव, काशीनाथ मोरे, नंदकुमार परदेशी, सुदाम धाडगे, अॅड.शारदा वाडेकर, कॉ. राजू पाटील, अॅड. दत्ता काळेबेरे, ओंकार मोरे, अॅड. राजेश कुंभारकर, मुकेश बामणे, गणेश मेरगू, तमन्ना इनामदार, बाळनाथ कुचेकर, मेजर सोनवणे, विजय जगताप, अशोक दळवी, ॲड. चंद्रकांत घाणेकर, विलास किरोते, संजय गायकवाड़, तमन्ना इनामदार, प्रविण परदेशी,आप्पराव चव्हाण, राजू कदम, राकेश नेवासकर, फय्याज इनामदार, साधना शिंदे, नवनाथ लोढें, एस. एम. शेख, अॅड. चंद्रशेखर दुधे
संपर्क : सत्यशोधक प्रबोधन महासभा, सत्यशोधक कार्यालय, ७५४ कसबा पेठ, पुणे ११, संपर्क : ९६९९६८२८९०
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission