छत्रपती संभाजीनगर : भारतीय संविधान, सन्मान, सुरक्षा व संवर्धन समितीतर्फे संविधान दिनी २६ नोव्हेंबर रोजी शहरातून भव्य पथसंचलन करण्यात येणार आहे. या पथसंचलनाच्या तयारीचा एक भाग म्हणून शनिवारी दुपारी नागसेनवन परिसरात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात १३ संघटनांनी सहभाग नोंदविला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, भडकलगेट येथे चारही दिशांनी ५०-५०च्या संख्येने लोक शांतपणे व शिस्तबद्ध पद्धतीने येतील. दर्शनी व्यक्तीच्या हातात तिरंगा व त्याच्या मागे शिस्तीत दोन-दोनच्या रांगेने लोक येतील. पुतळ्यापासून मुख्य पथसंचलन सुरू होईल. केंद्रभागी तिरंगाधारी तालावर तरुण राहील. त्यानंतर, पथसंचलन करणारे सैनिक युनिफॉर्ममध्ये बँडच्या संचलन करतील. मिलकॉर्नरमार्गे, औरंगपुरा, गुलमंडी, पैठण गेट येथून क्रांती चौकात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ गणसभेने पथसंचलनाची सांगता होईल. याबाबत चर्चा करण्यासाठी १२ रोजी सुभेदारी विश्रामगृह येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी झालेल्या बैठकीत अॅड. विजय वानखेडे यांनी पथसंचलनाची रूपरेषा सांगितली व उद्देश कथन केला. डॉ. संग्राम मौर्य, थोरेबाबा, सचिन निकम, अॅड.डी.व्ही. खिल्लारे, अंबादास रगडे, आर.पी. साळवे, बी.बी. अंभोरे, शैलेंद्र मिसाळ, राहुल साळवे, मुकुल निकाळजे, मिर्झा अब्दुल कय्युम नदवी, कबिरानंद आदींनी सहभाग घेऊन सूचना मांडल्या.