इडा पीडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे असे दरवर्षीच दिवाळी दसऱ्याला आमची माय माऊली आम्हाला औक्षण करताना म्हणत असते. आमच्या शुद्रातिशुद्रांच्या शेकडो हजारो पिढ्या बळीच्या राज्याची आस लावून खपल्या, मातीत गेल्या, मात्र अजूनही म्हणजे जवळपास चार हजार वर्षापासून आमच्या माय मावल्यांना अपेक्षित असे बळीचे राज्य अस्तित्वात आले नाही, म्हणून त्या आजही बळीचे राज्य येण्याची कामना दर दिवाळी दसऱ्याला करतात. कोण होता हा बळीराजा? कसं होत या बळीचे राज्य ? की आजही बळीच्या समतावादी आदर्श राज्याची नेणीव आमचा पिच्छा सोडायला तयार नाही. काय आहेत हे अदिबंध जे ब्राम्हणी जाणिवेचे हजारो वर्षाचे बंध तोडून बळीचे राज्य येवो असे आम्हाला म्हणायला भाग पाडून आमच्या मनाचा ताबा घेवून आम्हाला झपाटतात .
ब्राम्हणी जाणीव आणि अब्राह्मणी नेणीवे यांच्यातील संघर्षाच्या एकजुटीतील बळीराजाचे स्थान
भारतीय इतिहासाचे मुख्य दोन प्रवाह एक ब्राह्मणी ( वैदिकी) आणि दुसरा म्हणजे अब्राह्मणी (तांत्रिकी स्त्रीसत्तावादी). तश्या प्रकारचा श्लोक हारित नावाच्या एका प्रसिद्ध धर्मसुत्रकाराने नोंदवून ठेवला आहे. ते त्यांच्याच शब्दात पुढीलप्रमाणे
श्रुतिश् च द्विधा ! वैदिकी तान्त्रिकी च !
म्हणजे श्रुती ह्या दोन आहेत एक वैदिकी आणि दुसरी तांत्रिकी. तंत्र म्हणजे शेती आणि शेती ही पशुपालक रानटी आर्यांना माहीत असणे शक्य नाही. शेतीचा शोध स्त्रीने लावला असल्याने तांत्रिकी प्रवाह म्हणजे स्त्रीसत्तावादी. यावरून भारतीय इतिहासाची सुरुवात ही वैदिकीने नव्हे तर सिंधु खोर-याच्या निर्ऋतिच्या ऋती गणाच्या स्त्रियांनी आर्ष गणभाषेत गायलेल्या तांत्रिकी श्रुतीने होते. चातुर्वर्ण्य पितृसत्ताक वैदिकिने तांत्रिकीवर हिंसक विजय मिळवल्यानंतर तांत्रिकेला नामशेष करण्यास अपयशी झाल्यानंतर तिला बदनाम केले, विकृत केले स्त्रीसत्तावादी तांत्रिकी श्रुती मग नेनीवेत फेकली गेली आणि वैदिकी श्रुतीच इतिहासाची जाणीव बनत गेली.
मात्र ब्राम्हणी वैदिकी श्रुती ही तांत्रिकी श्रुतीच्या उसनवारीवरच असल्याने आपल्याला जाणिवेच्या आधारे या अंधारात फेकलेल्या अब्राह्मणी महाप्रवाहला उलगडून काढता येते. कारण ह्या दोन्ही आर्यांच्या आक्रमणापासून विरोधी संघर्षाच्या एकजुटित चालत येतात. यात ब्राम्हणी प्रवाहाने निर्ऋतीचा एकूणच सर्व अब्राह्मणी प्रवाह नेनिवेच्या गर्तेत झुगारून दिल्याने निर्ऋतीचा सर्वच प्रवाह आणि नहूष बळीसारखे विद्रोही महानायक नेनेवेत दफन होतात मग त्यांचे दुष्ट नेनिवेकरण करण्यात येते .
बळीराजा काही ब्राम्हणी पौराणिक ग्रंथामध्ये येतो तो भागवत पुराण, विष्णू पुराण, आणि काही इतरही ग्रंथांमध्ये येतो. राजा बळी हा दैत्य असुर म्हणून दाखवला गेला . मुळात वेदात राजाला असुर म्हणतात. ब्राम्हणी भागवत पुराण म्हणते की बळी उन्मत्त झाला होता म्हणून बळीराजाला ब्राम्हण बटू वामनाने तीन पावले जमीन मागून त्याला पाताळात घातले. मात्र तो दानशूर असल्याने पाताळात घातल्यानंतरही वामनाने बळीला पाताळातून वर्षातून एकवेळा पृथ्वीवर येवून आपली सिंधूप्रजाजनांना अजूनही सौख्य व समृधीत नांदते आहे की नाही हे पहायची परवानगी दिली हे तसे मिथकच . दसरा हा एकावेळी अब्राह्मणी स्त्रीत्तेच्या कृषीमायेचा सर्वोच्च सन तर दुसऱ्या बाजूला बळीराजाच्या अंताचा आणि ब्राम्हणी प्रवाहाच्या विजयाचा सण. दरवर्षी बळीराजा हा केरलात ओणम व महाराष्ट्रात दिवाळीला भुतलावावर येतो आणि आपल्या प्रजेचे हालहवाल बघतो असे दासशुद्र झालेली बळीची प्रजा आस लावून बसते. हे जरी एक मिथक असले तरी मात्र याच मिथकाने बळी राज्याची नेणीव हजारो वर्षापासून जपून ठेवली आहे. या नेणिवेमुळेच आपला बळीराजा भूतलावर आल्यावर त्याला कुणीही दुःखी कष्टी दिसू नये त्यामुळेच दिवाळी आणि ओनमच्या काही दिवस अगोदरही आणि नंतरही लोक सर्वोत्कृष्ट अन्न खातात सर्वोत्कृष्ट कपडे घालतात नृत्य, गायन आणि खेळांनी आपले मनोरंजन करतात या दिवशी स्त्रिया पुरुषांना औक्षण करताना आवर्जून इडा पिडा टळो बळीचे राज्य येवो असे म्हणत असतात . त्या दिवशी कुणीही काम करत नाही. घरातील नोकर-चाकर यांनाही घरी जायची सन साजरा करायची परवानगी मिळते. या दिवसात कुणीही मालक नसतो आणि कुणीही नोकर नसतो.....!!
भारतीय इतिहासाचे ब्राम्हणी आणि अब्राह्मणी हे दोन मुख्य प्रवाह आर्य रानटी पशुपालक ब्राम्हणी आर्यांच्या आक्रमणापासून एकमेकांशी झगडत परस्परांवर प्रभाव पाडीत संघर्ष करत जोडीने वाहत नकरक्रिया करत आलेले आहेत या त्यांच्या संघर्षात क्वचितच अब्राह्मणी प्रवाह विजयी होत असे मात्र बहुतेक सर्वच वेळा ब्राम्हणी प्रवाहच विजयी होवून अब्राह्मणी प्रवाह नेनिवेच्या गर्तेत दडपून टाकत असून इतिहासाची जाणीव बनत असे. निर्ऋतीने छंदासी वा तांत्रिकी श्रुती या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आद्य कृषीमायेचे व तिच्या अब्राह्मणी प्रवाहाचे सर्जन केले म्हणून आर्यांना जसा तिचा प्रवाहाच नेणीवेत ढकलावा लागला तसेच तिच्या वारसदारांना सुध्दा त्यांनी नेनीवेत ढकलले.
असेच आमच्या अब्राह्मणी प्रवाहातील निर्ऋतीची ज्ञातीची असलेल्या दितीच्या वंशातील दुसरे एक प्रभावी पिढ्यानपिढ्या नेणेवेत जपून ठेवलेलं व्यक्तिमत्त्व वा प्रतीक म्हणजे बळीराजा. भारतीय इतिहासातील दासवर्णविहीन समतेसाठी पहिला विद्रोह करणाऱ्या नहूष राजा नंतरचा हा दुसरा महान विद्रोही म्हणजे बली. पुराणांच्या वृत्तांतावरुन असे दिसते की बळी हा हिरण्यकश्यपुचा पणतू होता तर प्रल्हादाचा नातू आणि विरोचानाचा मुलगा होता. साडेचार हजार वर्षांच्या इतिहासात इतक्या दीर्घकाळ भारतीय जनमानसाने आपल्या मेंदूच्या नेणिवेत ( अंतर्मन) जपून ठेवलेला हा पहिलाच विद्रोही
या अगोदरही अब्राह्मणी असुर राजे झाले त्यात नहूषदेखील होता मात्र यांची कुणाचीही एवढी घट्ट नेणीव येथील सर्वहारा ( बहुजन) वर्गाने का जपून ठेवली नाही ?
बळीराजात असे काय विशेष होतं की आजही म्हणजे चार ते साडेचार हजार वर्षानंतरही आमच्या माय माऊल्यांनी त्याची दर दिवाळी दसऱ्याला आठवण काढावी ?
भारतीय समाजव्यवस्थेचा विचार केल्याशिवाय आपल्याला बळीराजा समजून घेता येत नाही.
भारतीय समाज हा मातृसत्ता , स्त्रीसत्ता त्यानंतरची येणारी मातृवंशक राजर्षीसत्ता आणि मग आर्यांनी लादलेली चातुर्वर्ण्य व्यवस्था यानी विकसित होत तो अराजक संघ गण आणि सामंतप्रथाक कालपर्यंत वाटचाल करतो ब्रिटिशांच्या आगमनानंतर येथे समंतप्रथाक व्यवस्थेचे विघटन न होता निम्नजातवर्ग समाजव्यवस्था अस्तित्वात येते.
या विकासक्रमात राजा बळी हा मातृवंशक दासप्रथाक राजर्षी समाजव्यवस्थेचे अपत्य. पुरणांच्या वृत्तांतावरून दिसते की विष्णूचे वैर दितीचा एकुलता एक पुत्र व बळीचा पणजोबा हिरण्यकश्यपू याच्यापासून सूरू झाले. दिती ही नैर्ऋतवंशियाची विभाजनरेषा होती. हिरण्यकश्यपुपासुन राजपद व ऋत्विजपद पुरुषांकडे गेले तरी राजपद मातृवंशकच राहिले. हे त्याची राणी , भागवतानुसार कयाधू नावाची दानवी होती यावरून दिसते. ' हिरण्यकशिपोर भार्या कयाधूर नाम दानवी !'.
हिरण्यकश्यपू विरुद्ध विष्णू व प्रल्हाद यांचा संघर्ष क्षत्रियवर्णप्राथम्य विरुद्ध ब्राम्हणवर्णप्राथम्य असा होता. हिरण्यकश्यपूची जरी या दोघांनी संगनमताने हत्या केल्यानंतर प्रल्हादाच्या राजरोहनाबरोबर ब्राम्हणप्राथम्य प्रस्थापित झाले तरी राजक त्रैवर्ण्य तसेच राहिले. नंतर वारसा परंपरेने हे राज्य वरूनसव वा राजसूय यज्ञाच्या नंतर असुर बळीच्या हातात आले. या वरूनसवात ब्रम्हन म्हणून उद्घोषित झालेला राजा लगेच जमिनीवर स्फ्यने सारवलेल्या जमिनीवर चौपटाची आकृती काढी त्यावर पाच फासे ठेवी. मुळात हा विधी राष्ट्र गणभुमीचे आधी ज्ञातीच्या हिश्यांत आणि नंतर कुलांच्यात वाटप करायाचा नियतकालिक विधी होता. हे तेच कार्य आहे की ज्यातून राजपदाची उत्पत्ती झाली.
बळीराजा हा निर्ऋतीच्या थेट घराण्यातला मातृवंशक त्रैवर्ण्य दासप्रथाक राज्याचा राजर्षी व वरूनाचा वंशज. त्याने आपल्या दासप्रथाक गणाच्या राष्ट्र गणभूमीचे अक्ष व चौपटाच्या वा इरीण/अधिदेवनच्या साह्याने सर्व गणामध्ये समसमान वाटप केले. बळीने या चौपटाद्वारे गणातील दासांनाही स्वातंत्र्य, समता आणि बंधुता बहाल केली.जसे नहूषाने शूद्रांची बाजू घेवून इतिहासाचे चक्र उलट स्त्रीसत्तेकडे फिरवण्याचा प्रयत्न केला तसाच प्रयत्न बळीने दासकम्मकर, व क्षत्रिय आणि दासकर्मकरांच्या स्त्रियांना प्राधान्य देवून स्त्रीप्रधान समता प्रस्थापित करून दासप्रथाक राजक स्त्रीसत्तेकडे उलट फिरवण्याचे पाऊल टाकले. मुळात हे काम स्त्रिसत्तेत गणाची राष्ट्री करी. वैराज्य ( स्त्रीराज्यात) समता व लोकशाहीची हमी अक्ष व अधिदेवन- इरीण ( चौपट) यांच्यामध्ये होती. यात अक्ष व इरिण-अधिदेवन गणभुमी व गणधन यांचे ज्ञाती व घटक कुलांमध्ये वाटप करी तर अक्ष मतदानात मताचे काम करीत.
बळीने हे काळाचे चक्र पुरुषसत्तेकडून समतावादी स्त्रीसत्तेकडे फिरवण्याचा जो प्रयत्न केले म्हणून आदित्य विष्णू वामन रूपाने बळीच्या सिंधू राज्यात तेथील ब्राम्हण वर्णाच्या मदतीने आक्रमक प्रवेश करतो या संघर्षात बळीला आपले प्राण गमवावे लागतात. परंपरा सांगते की बळीने वर्णसंकर केला म्हणून त्याला विष्णूरूप वामनाने तिसऱ्या पावलाने पाताळात गाडले. मात्र येथे हे लक्षात घेतले पाहिजे की बळीराजाने अक्ष व अधिदेवन/इरीणद्वारा समता व लोकशाहीचे पुनर्जीवन केले होते. भारतीय इतिहासाचा उलगडा करताना मिथ्सचा रहस्यभेद करावा लागतो. मिथ म्हणजे अतीमानुषी पद्धतीनें सांगितलेला इतिहास असतो. यात विष्णूने तीन पावलांनी विश्व व्यापले हे जे म्हटले जाते ते मुळात निर्ऋतीने सिंधुजनांना अक्ष आणि अधिदेवण /इरीण दिलेली स्वातंत्र्य, समता व लोकशाहीची ( मित्रता) परंपरा राजा बळीला पाताळात लोटल्याने शेवटाला गेली. असुर राजा बळीच्या अंतानंतर विखुरलेल्या नैर्ऋतांनी आपले राज्य केराळपर्यंत नेले.
अमरकोष पाताळास बलीसद्य म्हणते आणि पातळाची अधिदेवता निर्ऋती असून तिची सिंधू नदी वैतरणी आहे असे म्हणते.
भारताची आद्यातम कृष्णा निर्ऋती जिने अक्ष व चौपटाद्वारे भारतीय इतिहासात स्वातंत्र्य, समता व लोकशाहीचे प्रवर्तन केले तिला आर्यांनी जीवनाऐवजी मृत्यूची, शुभा ऐवजी अशुभाची देवता ठरवून पाताळात लोटले. मग ही जीवनाची जीवनाची देवता, सुपिक्तेची देवता मृत्यू आणि नापीकतेची नरकदेवी बनली. भारतीय इतिहासात निर्ऋती आणि बली व त्यानंतरची वैदही सिता पाताळाचे अनुक्रमे नरकदेवी, राजा आणि पुत्री असणे हा योगायोग नाही. या तिघांनाही पाताळात लोटल्याशिवाय आर्यांना येथील सिंधूजणांवर चातुर्वर्ण्य शूद्रप्रथाक दासप्रथा लादणे शक्य नव्हते.
लोकपरंपरा व तांत्रिक श्रुतींचा आद्य पुराणेतिहास यांचा असा आश्चर्यकारक संगम होतो. बलीचा धर्म स्त्रीसत्तेच्या पुनरूत्थानाचा होता. तो निर्ऋतीचा प्रतिनिधी म्हणून राज्य करू इच्छित होता. भारतीय इतिहासातील ती सर्वात मोठी समतेची क्रांती होती......!
राजा बळीची ब्राम्हणी प्रवाहाने कितीही बदनामी करून त्याला असुर( वेदात अर्थ राजा) राक्षस ठरवून त्याचा अब्राह्मणी समतावादी स्त्रीसत्तावादी प्रवाहच नेनिवेच्या गर्तेततील अंधारात गडप करण्याचा प्रयत्न केला, मात्र इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो या म्हणीतून महाराष्ट्राने या दैत्याराज असुर बळीच्या वर्णविहीन समानतेच्या समाजाची आठवण अक्षूण्ण ठेवली आहे.इडा म्हणजे अन्न वा भूमाता ( पृथ्वी) इथे मात्र त्या म्हणीचा अर्थ अन्नावरील पिडा जावो आणि बळीचे राज्य येवो असाच अर्थ घ्यावा लागेल.
आर्यांनी बळीचे कितीही दुष्ट नेणिवेकरण केले असले आणि राक्षस बळी उन्मत्त झाल्यामुळेच विष्णूने वामन आवतार घेऊन बळीला पाताळात घातले असे सांगितले असले तरी मात्र राजा बलिने दासकर्मकर आणि क्षत्रियांच्या स्त्रियांना प्राधान्य देवून स्त्रीप्रधान समता प्रस्थापित केली असल्याने शूद्रांतिशुद्र स्त्रिया विजया ( दुर्गा) दशमीच्या दिवशी सोने लुटून येणाऱ्या आपल्या पुरुषांचे उंबरठ्यावर स्वागत करताना इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो असे म्हणत असल्याचे फुले सांगतात. यावरून येथील जनमाणसांची अब्राह्मणी नेणीव राक्षस बळीला आपला समतावादी पूर्वज राजा आणि त्याचे राज्य आदर्श भेदविरहित असल्याचेच मानते.
ब्राम्हणी जाणिवेने जरी त्याला उन्मत्त राक्षस ठरवले असले तरीही आमची माय माउली एका राक्षसाचेच राज्य यावे म्हणते तिला वामनाने राज्य नकोय.
राक्षस म्हणजे कोण तर रक्षती इती रक्षस : ! म्हणजे रक्षण करणारे ते राक्षस मात्र ब्राम्हणी धर्मग्रंथांनी येथील सिंधुजन नैर्ऋतांना असुर, दैत्य , राक्षस यांची बदनामी करून त्यांचे दुष्ट नेनिवेकरण केले त्यांना खलनायक ( विलेन) ठरवले तरी मात्र आमचा राजा बळी याला अपवाद ठरला तो हजारो वर्षापासून येथील बहुजनांनी आपल्या नेनेवेत जपून ठेवला.
हिंदू पंचांगात दोन दिवस असे आहेत ज्यादिवशी विधिपूर्वक जुगार ( गणभूमी आणि गणधान्य गणात समसमान वाटून द्यायचा चौपट) खेळला जातो एक आश्विन महिन्यातील कोजागिरी पौर्णिमा आणि आणि दुसरा आहे कार्तिक महिन्यातील बलिप्रतिपदा. आपले प्रयोजन आहे बलिप्रतिपदेशी. या दिवशी स्त्रिया औक्षण करताना स्त्रिया इडा पिडा टळो आणि बळीचे राज्य येवो असे म्हणतात.
ओणम हा केरळचा सर्वात मोठा उत्सव बळीराजाचा आहे. या सणात सारवलेल्या जमिनीवर चौपट काढून त्यावर केळीच्या खांबाच्या चौयट्यांनी चौपटाचा खेळ खेळायची अजून परंपरा असल्याचे व या दिवसात कोणीही काम करत नाही. घरातल्या नोकरचाकरांनाही सन साजरा करायची परवानगी मिळते. या दिवसांत सर्व लोक सर्वोत्कृष्ट अन्न खातात, सर्वोत्तम कपडे घालतात, नृत्य गायन व खेळांनी आपले रंजन करत असल्याचे ई. एम.एस. नंबुदीरीपाद त्यांच्या केरळ यस्टर्डे, टूडे अँड टुमारो या पुस्तकात (पा.२९-३०) म्हणतात.
बाकी भारतात ज्या अमावस्येच्या दिवशी दिवाळी येते ती निर्ऋती अमावस्या असून त्या दिवशी महाविरांचे निर्वाण झाल्याने जैनाना ती पूज्य असूनही तिचा ब्राम्हणांनी मागमूसही ठेवला नाही. बलिप्रतिपदा आणि देवानंदा (निर्ऋति) अमावस्या हे सोबत येणे आणि दिवशी चौपटाचा खेळ जो की मुळात स्वातंत्र्य समता आणि लोकशाहीचे प्रवर्तन होते तो विधिपूर्वक खेळणे हे निर्ऋति आणि बळीराजाच्या समतेची नेणीव दाखवतात. ही झाली भारतीय सन आणि उत्सवामागील बळीराजा आणि निर्ऋतिची नेणीव.
बळीराजाची समतावादी नेणीव येथील सर्वहारा बहुजनांच्या नेणिवेत एवढी जबरदस्त आहे की आमच्या माय- मावल्या तर त्याच्या राज्याची कामना करतातच मात्र येथील संतांनी थेट त्यांचे आराध्य असलेल्या विठ्ठलालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केलेले आहे.
संत तुकाराम महाराज बळीराजाची बाजू घेवून विठ्ठलाला दोष देतात त्याला आरोपी ठरवतात. ते म्हणतात,
हरी तू निष्ठुर निर्गुण नाही माया बहु कठीण!
नव्हे ते करसी अन कवणे नाही केले ते!!
बळी सर्वस्वी उदार!
जने उभरीला कर!
करोनी कहर तू पाताळी घातला!
देवा तू किती निष्ठुर आहेस तुझ्याजवळ कसलीही माया नाही तु फार कठोर आहेस, सर्वसी उदार अश्या बळीला तू पाताळात घालून कहर( सर्वात मोठा गुन्हा) केला आहेस.
याही पुढे जाऊन बळीराजाची बाजू घेताना आमची जनामाय म्हणते,
पुण्यवंत तो पाताळलोकी नेला!
दरिद्री तो भाग्यवंत केला !
चोरट्याचा बहुमान केला !
कीर्तीवणाचा आपमान केला!
धुंद झाला तुझा दरबार !
आमची जनामाय ही विठ्ठलाला दटावून म्हणते अरे विठ्ठला असा कसा तुझा दरबार धुंद झाला आहे तू पुण्यवंत असलेला बळी पाताळी घातलास आणि दरिद्री असलेला वामन भाग्यवंत केलास बर आमची जनामाय वामनाला दरिद्री म्हणण्यावरच थांबते काय तर नाही ती वामानाला चोरटा सुद्धा म्हणते आणि बळीराजाला किर्तिवान म्हणते. आमच्या जनामयीने एका राक्षस ठरवल्या गेलेल्या बळीची बाजू का घ्यावी ?
संत नामदेव म्हणतात की,
"अपराधाविन बळी पाताळी घातला."
संत नामदेव महाराज ही बळीजी बाजू घेताना म्हणतात की, बळी हा निरपराध होता तरीही तो पाताळी का घेतला?
संत तुकाराम महाराज म्हणतात की,
बळीया माझा पांढरीराव तो ह्या देवांचा ही देव!
यातून संत तुकाराम महाराज बळीराजालाच आपला विठ्ठल बनवतात आणि वामणाला नाकारतात.
यावरील संताच्या बळीराजाच्यावरील भूमिकावरुन बळीराजाच्या समतावादी नेणिवेची पकड लक्षात येते.
आधुनिक काळामध्ये महात्मा फुले हे बळीराजा वर पोवाडा लिहितात तो असा,
आमुच्या देशीचे अतुल स्वामी वीर!!
होते रणधीर !! स्मरू त्यास! ध!!
बलिस्थानी आले शुर भैरोबा! महासुभा!! १!!
सद्गुणी पुतळा मूळ राजा बळी
दसरा दिवाळी! आठवीती!!२!!
क्षेत्रीय भार्या " इडा पीडा जावो!
बळीचे राज्य येवो"!! अशा का बा?!!३!!
आर्यभट्ट आले सुवर्ण लुटिले !!
क्षेत्री दास केले बामपत्ता !!४!!
वामन का घाली बळी रसा तळी
प्रश्न जोती माळी करी भट्टा!!५!!
या पोवड्याच्या माध्यमातून महात्मा फुले हे बळीराजाची बाजू घेऊन भट्टांंना जाब विचारतात.
महात्मा फुले आपल्या समग्र समतेवर आधारलेल्या भावी समाजाची आपली प्रेरणा राक्षस बळीच्या राज्याच्या लोककथेवरुण घेतात. ते बळीला येथील शुद्रातिशुद्रांच्या संघर्षाचे, समतेचे प्रतीक बनवतात.
बळीचा ब्राम्हण वामानाकडून पराभव झाल्यापासूनच भारतीय इतिहास हा ब्राम्हण विरुद्ध शुद्रांच्या वर्णजाती संघर्षाचा इतिहास आहे. अशी व्याख्या खुद्द फुलेच करतात आणि दाखवून देतात या देशातील मुख्य संघर्ष हा ब्राम्हणी विरुद्ध अब्राह्मणी छावणी असाच आहे.
आजही बळीराजा म्हटले की लगेच शेतकरी लक्षात येतो किंबहुना आजही शेतकऱ्याला बळीराजा म्हटले जाते. एव्हढी घट्ट नेणीव आहे आजही येथील जनमाणसांत बळीराजाच्या इतक्या खोलवर रुजलेल्या नेनीवेचे मूळ काय?...
अक्ष व चौपट/आधिदेवनाद्वारे सिंधुजनांमध्ये राष्ट्र जमिनीचे आणि गणधान्याचे समसमान वाटप करण्यार्या निर्ऋतीचा राजा बळी वारसदार होता. तो चौपटाद्वारे
प्रजाजनात जमिनीचे समसमान वाटप करत असे. त्यामुळेच त्याच्या राज्यात स्वातंत्र्य, समता आणि मित्रता होती. त्यामुळेच बळीराजाची समतावादी वा समाजवादी नेणीव येथील जनसमाजात घट्ट रुजण्याचे प्रमुख कारण असेल.
आधुनिक काळामध्ये फुले ब्राम्हणी सांस्कृतिक छावणीच्या विरोधात अब्राह्मणी सांस्कृतिक समतेचा पर्याय म्हणून ते आपल्याला बळीराजा देतात. बळीराजाच्या झालेल्या पराभवातून ते भारतीय संघर्षाचा इतिहास हा वर्णजाती संघर्षाचा इतिहास असल्याची मांडणी करतात. महात्मा फुले यांनी लिहिलेला ग्रंथ शेतकऱ्यांचा आसूड आणि त्यांचे शेतकरी लढे हे बळीराजाच्या प्रेरणेतूनच झाल्याचे दिसून येतात.
आजच्या घडीला ब्राम्हणी वामनाच्या सांस्कृतिक वर्चस्वाला आव्हान म्हणूनही बळीराजाच आपल्या मदतीला येऊ शकतो. आजचा आर्य वामन त्याच्या शोषणशासणाच्या तीन पावलांच्या रुपात म्हणजेच उच्चभ्रू मिरासदार, ब्राम्हणी बुद्धिजीवी आणि बनिया भांडवलदारांच्या रूपात येथील सर्वहारा बळीराजाला गाडण्यासाठी सदैव तयार तो स्वातंत्र्य समता आणि लोकशाही ही मूल्यत्रयी पायाखाली तुडवत आहे. तसा त्याने तीन कृषी कायदे करून बळीराजाला पाताळात गाडण्याचा प्रयत्न केला मात्र तो बळीराजाने हाणून पाडला आहे.
१०.७१.९ ही ऋचा शेती करणाऱ्यांना तुच्छतेने सिरिन् म्हणजे नांगरगठ्ठे म्हणते. काही वैदिक ऋचांमध्ये शेती करणाऱ्यांना जुगारी, कितव : अब्राह्मण म्हणून त्यांचा निषेध करते ही आहे प्राचीन काळापासुनची ब्राम्हणी आर्यांची शेती आणि शेतकर्यांविषयीची भूमिका ती आजपर्यंत चालत आलेली आहे. म्हणूनच कधी कृषी कायदे करून बळीराजाची जमीन हाडपण्याचा प्रयत्न होतो तर कधी अख्ये पीक पाण्यात गेलेले असताना देखील त्याला योग्य ती मदत केली जात नाही. बळीराजाच्या मालाला भाव मिळून तो सुखी समृद्ध होवू नये म्हणूनच त्याच्या मालाचे भाव पाडण्यासाठी आयातधोरण आखले जाते. कृषीक्षेत्र कसे अरिष्टात येईल अन् हा बळीराजा कसा झाडाला लटकून फासी घेईल असेच धोरण प्रत्येकच सरकाकरकडून आखले जाते कारण सरकार कुणाचेही असले तरी येथील सर्वहारा आणि बळीराजाचे शोषणशासन करणारी ब्राम्हणी वामनरूपी यंत्रणा म्हणजे ब्राम्हणी बुद्धिजीवी, बनिया भांडवलदार आणि उच्चभ्रू मिरासदार यंत्रणा नेहमीच शोषणासाठी तयार असते.
सध्याच्या आजच्या घडीला निमभांडवली निम्नजातवर्गीय परिस्थीत जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती आणि त्यानंतरच्या करावयाच्या समाजवादी क्रांतीची वेळ आली असताना अन् चौपटाद्वारे आणि आक्षद्वारे राजा बळीची स्वातंत्र्य, समता व लोकशाहीची ( बंधुता) नेणीव समाजवाद उभारणीला येवून भिडत असल्याने तसेच बळीराजा सर्वहारा शेतकरी व जनमाणसांच्या समाजवादी नेनीवेचा ठाव घेत असल्याने कुणालाही मग ते सत्यशोधक असोत की डावे असो त्यांना बळीराजाला मिथ किंवा काल्पनिक ठरवून दुर्लक्ष करता येणार नाही. त्यांनी बळीराजा बरोबरच स्त्रीसत्तेच्या अब्राह्मणी प्रवाहाशी नाते जोडून विधायक प्रबोधन केले तरच ते जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती आणि त्यानंतरच्या करावयाच्या समाजवादी क्रांतीच्या उभारणीकडे कूच करू शकतील. इतिहास हा कधीच मरत नसतो तो चुकीच्या आकलानातुन प्रेरक न बनता बाधक बनत असतो.
हे सर्वांनी लक्षात घेवून समग्र समतेच्या क्रांतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत इतिहासातील समतावादी प्रवाह, परंपरा, प्रतिके यांचे सम्यक आकलन करून ते समग्र क्रांतीसाठी प्रेरणास्रोत बनवावेत त्यातून जीवनरस घ्यावा.
सर्व सिंधूजन नैर्ऋतांना बळीराजा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!????????
संदर्भ:
1] मार्क्सवाद - फुले - आंबेडकरवाद.
2] दासशुद्रांची गुलामगिरी खंड १ व २.
3] जात्यंतक भांडवलदारी लोकशाही क्रांती आणि तिची समाजवादी परिपूर्ती.
4] प्रिमिटिव्ह कम्युनिजम मातृसत्ता -स्त्रीसत्ता आणि भारतीय समाजवाद.
5] आर्य आणि अनार्य.
6] केरळ येस्टर्डे टुडे अँड टुमारो ई.एम.एस.नबुदिरीपाद.
7] संत जनाबाई जीवन चरित्र लेखक नितीन सावंत.
8] महात्मा फुले समग्र साहित्य.