परभणी - जिल्हाधिकाऱ्यांकडून जिल्ह्यात दरवर्षी दिल्या जाणाऱ्या स्थानिक सुट्ट्यामधून चालू वर्षात वगळण्यात आलेली श्री खंडोबा यात्रेची सुट्टी धनगर समाज संघर्ष समितीच्या मागणीनंतर पुन्हा कायम करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले आहे. शरातील खंडोबा मंदिर हे जागृत देवस्थान म्हणून परभणी जिल्हयातील प्रसिद्ध असून या मंदिराला मानणारा भाविकांचा मोठा वर्ग जिल्ह्यात आहे. या ठिकाणी दरवर्षी मोठी यात्रा भरविली जाते जी खंडोबा यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. या यात्रेनिमित्त दरवर्षी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थानिक सुट्टी जाहीर करण्यात येते व ही परंपरा मागील अनेक वर्षांपासून सुरु आहे. परंतु, जिल्हाधिकारी, परभणी यांनी २६ डिसेंबर २०२३ रोजी काढलेल्या परिपत्रकामध्ये वर्ष २०२४ करिता जाहीर करण्यात आलेल्या जिल्ह्यातील स्थानिक सुट्ट्यामध्ये खंडोबा यात्रेची सुट्टी वगळण्यात आली होती, त्यामुळे धनगर समाज बांधवांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती.
या अनुषंगाने, धनगर समाज संघर्ष समितीचे प्रदेशाध्यक्ष अनंत बनसोडे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने गुरूवारी (ता. ४) जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी परभणीचे आमदार डॉ. राहुल पाटील हेही उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाची मागणी तात्काळ मान्य करून खंडोबा यात्रेची वार्षिक सुट्टी पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले.