अमळनेर, दि. २८ - शेतमालाला भाव नाही, उत्पादन नाही म्हणून शेतकरी आत्महत्या करीत आहे. तरुणांना कायमस्वरुपी नोकऱ्या न देता कंत्राटी पद्धतीने काम देऊन त्यांना राबवून घेतले जात आहे, तर दुसरीकडे जनतेकडून कर स्वरूपात जमा होणाऱ्या पैशांची अखिल भारतीय साहित्य संमेलनावर सरकारी पैशांतून कोट्यवधींची उधळपट्टी केली जात आहे, असे सांगून त्यांनी विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनावर प्रा. प्रतिमा परदेशी यांनी टीका केली.
या साहित्य संमेलनाची 'सरकारी साहित्य संमेलन' अशी नवी ओळख तयार होत असून, सरकार त्यांच्याकडे पाणी भरत असल्याचे यावेळी बोलताना प्रा. परदेशी यांनी सांगितले. अमळनेरात ३ व ४ फेब्रुवारी रोजी १८ व्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून, या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक श्याम पाटील यांची बुधवारी पत्रकार परिषदेत घोषणा करण्यात आली. त्यावेळी प्रा. परदेशी यांनी सरकार व अखिल भारतीय साहित्य संमेलनावर टीका करताना अखिल भारतीय साहित्यं संमेलन व आमच्यात विचारांचे युद्ध आहे. त्यांच्या मूल्य संस्कृतीच्या विरोधात मुद्दाम आम्ही हे अमळनेरात साहित्य संमेलन घेत आहोत, असे सांगितले. दरम्यान, या संमेलनाला शासनाने तीन कोटी ८० लाखांचे अनुदान देऊ केले आहे. त्यातच जिल्हाधिकारी बैठका घेत आहेत. त्यामुळे हे सरकारी साहित्य संमेलन आहे का? संमेलनावर जनतेच्या पैशांतून उधळपट्टी होणार आहे. त्यामुळे अनुदान तातडीने बंद करावे, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या कार्याध्यक्षपदी मुकुंद सपकाळे, अमळनेर येथील धनदायी कला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. डॉ. लीलाधर पाटील, मिलिंद बागुल, प्रा. अशोक पवार, करीम सालार रणजित शिंदे यांच्या निवडीची घोषणा यावेळी करण्यात आली.