दि. ३ जानेवारी २०२४ (तुकाराम माळी) जत येथील माळी समाजाचे वतीने विविध उपक्रम राबवून क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली. सुरवातीला महात्मा ज्योतीबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.लहान मुलाने व मुलीनी अतिशय सुंदर अशा भाषणात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी माहिती सांगताना म्हणाले की
क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला.त्यांच्या वडिलांचे नांव खंडोजी नेवसे पाटील तर आईचे नांव लक्ष्मीबाई होते. लहान पणापासून सावित्रीबाई साहसी वृत्तीच्या होत्या. वयाच्या नवव्या वर्षी तेरा वर्षे वयाच्या महात्मा ज्योतिबा फुले यांच्याशी १८४० साली विवाह झाला.
महात्मा फुले यांनी शिक्षण अभावी बहुजन समाजाची दशा वाईट झाली हे
विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
यातून सुचित केले. आणि स्त्रियाना व बहुजनाना शिक्षण मिळण्यासाठी फुले दांपत्यांनी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले. सावित्रीबाई या कवयित्री सुद्धा होत्या.
ज्योतिराव फुले यांनी सामाजिक सुधारण्याच्या उद्देशाने भरपूर लिखाण केले.तृतीय रत्न नाटक, छत्रपती शिवाजी महाराज पोवाडा, विद्याखातिल ब्राह्मण, पंतोजी पोवाडा, ब्राम्हणाचे कसब, गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड, सतसार, इशारा, सार्वजनिक सत्यधर्म ही पुस्तके लिहली. ज्योतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतिला प्रज्वलीत करण्याचे कार्य सावित्रीनेच केले सावित्रीबाई फुले यांनी १ जानेवारी, इ.स. १८४८ रोजी पुण्यात बुधवार पेठेतील भिडेवाड्यात जोतीरावांनी मुलींची शाळा काढली. या शाळेत सावित्रीबाईंची शिक्षिका म्हणून नेमणूक करण्यात आली होती. यामुळे सावित्रीबाईंना पहिल्या भारतीय शिक्षिका म्हंटले जाते. सावित्रीबाईना प्रतिगाम्याकडुन चिखल,गोडे,शेण,अपमान यांचा मारा सहन करुन आपले स्त्रियाना शिक्षण देण्याचे कार्य सुरु ठेवले.येवढेच नव्हे तर चिखल शेणांनी माखलेली साडी बदलून आपल्या स्त्री शिक्षणाचे कार्य जोमाने सुरू ठेवले. इ.स. १८४८ ते १८५२ पर्यंत त्यांनी एकूण १८ शाळा काढल्या. इ.स. १८५४ साली त्यांचा ‘काव्यफुले’ हा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला.२८ जानेवारी १८६३ साली स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना करून एक प्रसूतिगृहही सुरू केले. बालहत्या प्रतिबंधगृह जोतीरावांनी सुरु केले असले तरी त्याच्या देखरेखीची संपूर्ण जबाबदारी सावित्रीबाईंवर होती. १८७६–७७ च्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. इ.स. १८९३ साली सासवड येथे झालेल्या ‘सत्यशोधक परिषदे’चे अध्यक्षपद सावित्रीबाईंनी भूषविले. इ.स. १८९६ सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणाऱ्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठविले.
जुलै १८८७ मध्ये ज्योतिराव फुले यांना पक्षाघाताचा आजार झाला. २८ नोव्हेंबर १८९० रोजी ज्योतिरावांचे त्या आजारात निधन झाले. अत्यंयात्रेच्यावेळी जो टिटवे धरतो त्याला वारसा हक्क मिळत असल्याने ज्योतिरावाचे पुतणे आडवे आले आणि ज्योतिरावांचा दत्तक पुत्र यशवंतरावांना विरोध करू लागले. त्यावेळेस सावित्रीबाई धैर्याने पुढे आल्या व स्वत: टिटवे धरले. अंत्ययात्रेच्या अग्रभागी चालल्या आणि स्वत:च्या हाताने ज्योतिरावांच्या पार्थिवाला अग्नी दिला. यशवंतराव हा विधवेचा मुलगा असल्याने त्याला कुणीही मुलगी द्यायला तयार नव्हते. तेव्हा कार्यकर्ता ज्ञानोबा कृष्णाजी ससाणे यांच्या राधा नावाच्या मुलीशी ४ फेब्रुवारी १८८९ रोजी विवाह यशवंतचा करून दिला. हाच महाराष्ट्रातील पहिला आंतरजातीय विवाह होय.
१८९७ मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने थैमान घातला होता. हा जीवघेणा आजार अनेकांचे जीव घेत होता. त्यातून उद्भवणारे हाल ओळखून प्लेग पीडितांची सेवा करताना सावित्रीबाईंनाही प्लेग झाला. यातच १० मार्च १८९७ रोजी वयाच्या ६६व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.
प्रमुख वक्ते ओबीसी नेते तुकाराम माळी यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त समाज प्रबोधन करताना सांगितले की देशातील प्रमुख पाच समाज सुधारक बुद्ध,बसवण्णा, फुले,शाहू, आंबेडकर पैकी बुद्ध,बसवण्णा आणि फुले यांच्याशी माळी समाजाचे नाते असून सुध्दा जत शहरातील माळी समाज हा आर्थिक दृष्टीने सक्षम असून सामजिक दृष्टीने मागास आहे. त्याचे कारण आपण बुद्ध, बसवण्णा, फुले, शाहू आंबेडकर यांच्या जयंती,पुण्यतिथी निमित्य त्यांच्या प्रतिमाचे पूजन करतो आणि त्यांच्या जीवन चरित्र विषयी पाठांतर करून अथवा वाचून भाषणे करतो.माळी समाज हा शेतीसह शेतीपूरक व्यवसायावर उदर निर्वाह करीत असल्याने या व्यतिरिक्त विचार करण्यासाठी वेळ नसतो. परंतू महामानवांचा वारसा आपणांस लाभला असतांना त्यांचे विचार आत्मसात करून पुढच्या पिढीपर्यंत पोहचवणे हे आपले कर्तव्य आहे हे विसरुन चालणार नाही. फक्त जयंती पुण्यतिथी दिवशी महामानवांचे प्रतिमा पूजन करणे एवढ्या मर्यादित कार्यक्रम करण्यामुळे समाज सुधारकांनी अतिशय वाईट काळोखात, अज्ञान, अंधश्रध्दा, अंधकारमय परिस्थिती मध्ये असंख्य यातना शोसून अहोरात्र कष्ठ आणि जीवाचे राण करून समाजाला प्रकाशाकडे नेण्याचा मार्ग दाखविला. हा मार्ग प्रकाशमय होऊन आपले राहणीमान उंचविण्यासाठी फक्त महामानवांच्या जयंती, पुण्यतिथी निमित्य प्रतिमा पूजन भाषणे याबरोबर समाजाची साप्ताहिक, पाक्षिक किंवा मासिक बैठक घेऊन विश्वगुरू बसवण्णा यांनी दिलेला जगातील परिपूर्ण लिंगायत धर्म आणि महात्मा फुले यांनी दिलेला सत्यशोधक धर्माचे विचाराबरोबर महात्मा बुध्दांचे धर्म विषयक विचार यावर चर्चा होऊन ते आत्मसात करणे गरजेचे आहे. बुद्ध शाक्य म्हणजे माळी होते परंतु आज आपण बुद्ध, लिंगायत आणि सत्यशोधक धर्माचे आचरण न करता आपले शोषण करण्याकरिता स्थापन केलेल्या वैदिक ब्राह्मण धर्माचे पालन करून आपणच आपल्यावर अन्याय करून घेतो.म्हणून आज आपण बुद्ध, बसवण्णा, फुले यांचे वारदार असल्याने तसेच शाहू महाराज यांनी सुद्धा महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचार अंगीकारले आणि ते पुढे चालू ठेवण्यासाठी व्यवस्था निर्माण केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सत्यशोधक समाजाचे कार्य पुढे सुरु ठेवले.एवढेच नव्हे तर शाहू महाराज धारवाड येथे लिंगायत धर्माची दीक्ष घेणार होते. त्यांनी लिंगायत धर्म वाढावा म्हणून कोल्हापूर येथील दसरा चौकात पाच एकर जागा चित्रदुर्ग मठास दिली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्म चिकित्सा करून आधुनिक युगात एक चांगला धर्म निर्माण करण्यासाठी मूठभर धर्म मार्तंडाकडे मागणी केली त्यांनी त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्यावर १३ आक्टोंबर १९३५ रोजी येवला परिषदेत मी जरी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही असे जाहिर केले. आणि त्यांनी जगातील सर्व धर्मांचा २१ वर्षे अभ्यास केल्यानंतर १४ आक्टोंबर १९५६ रोजी नागपूर येथील दीक्षा भूमिवर धम्म परिवर्तन दिनाच्या दिवसी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली. एवढेच नव्हे तर भारतीय संविधान निर्माण करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध, बसवण्णा, फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांचे संविधान आपल्याला दिले असून हे सुद्धा आपल्याला माहित नाही. अज्ञानापोटी मनुवादी संविधान निर्माण करणाऱ्याच्या पाठीमागे आपण धावतो हुरळली मेंढी लांडग्याच्या पाठीमागे धावली अशी आपली आज अवस्था झाली आहे. म्हणून रात्र वैयाची आहे सावध रहा म्हणण्याची वेळ आली आहे.
आपल्याला सुदैवाने जगातील परिपूर्ण लिंगायत धर्म मिळाला आहे. या धर्माचे संस्थापक विश्वगुरू बसवण्णा यांचा जन्म २४ एप्रिल ११३४ साली कर्नाटक राज्यातील विजापूर जिल्ह्यातील बसवाण्ण बागेवाडी जवळील इंगळेश्वर येथे वैशाख महिन्याच्या अक्षय तृतीय दिवशी झाला. बसवण्णा जन्मजात कुशाग्र बुद्धिमत्तेचे चिकित्सक होते. बसवण्णा यांच्या जन्म काळात सर्वत्र अज्ञान, अंधकार, अनिष्ट रूढी परंपरा चालीरीती, अंधश्रध्दा ,जातीवाद यांचा हाहाकार माजला होता. बसवण्णा यांचा जन्म अशाच रूढीवादी घराण्यात झाला. पंरपरे प्रमाणे वयाच्या आठव्या वर्षी उपनयन म्हणजे मुंजी करण्यासाठी घरातील पालकांनी आग्रह धरला असता बसवण्णा यांनी माझ्या पेक्षा दहा वर्षानी मोठी असलेली बहिण नागलबिंका ही स्त्री म्हणून मुंज होत नसेल तर या स्त्री पुरुष भेदभाव विरोध बंड करून बसवण्णा घरातून निघून गेले थेट कुडल संगम येथील ईशान्य गुरू यांच्या आश्रमात पुढे ते ईशान्य गुरू यांच्या आश्रमात वेद,पुराण,शास्त्र यांचा त्यांनी सखोल विध्याभ्यास केला.विध्याभ्यास केल्यावर विश्वगुरू बसवण्णा यांना जाणविले की अज्ञान, अंधकार, अनिष्ट रूढी परंपरा चालीरीती, अंधश्रध्दा ,जातीवाद यांचे मूळ हे वैदिक धर्मात असून या धर्मात उपाषणा पध्दतीसुध्दा विचित्र आहेत म्हणून याला पर्याय म्हणून बाराव्या शतकात विश्वगुरू बसवण्णांनी मानवता वादी लिंगायत धर्माची १४ जानेवारी ११५५ या दिवसी स्थापना केली म्हणून हा दिवस लिंगायत धर्म स्थापना दिवस इष्टलिंग अविष्कार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. बसवण्णा यांना वेद,पुराण,उपनिषदे इत्यादींचा अभ्यास केल्यानंतर एका स्वतंत्र अतिशय चांगल्या धर्माची त्यांना गरज वाटली. त्यांना विविध धर्मातील काही तत्वे आवडली असली तरी संपूर्ण तृप्ती प्राप्त झाली नव्हती. बसवण्णा यांना असे वाटले की लोकांमध्ये प्रचलित असलेल्या उपासना वस्तू विचित्र आणि विलक्षण असून परिपूर्ण नाहीत.म्हणून त्यांना विश्व आकाराचा इष्टलिंग अविष्कार झाला. अशा प्रकारे विश्वगुरू बसवण्णांनी पवित्र अशा लिंगायत धर्माची स्थापना केली. विश्वगुरू बसवण्णा यांचे विचार मानव कल्याणाच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहेत. विश्वगुरू बसवण्णांनी आपणास जगातील परिपूर्ण पवित्र असा लिंगायत धर्म दिला आहे.
परंतू दुर्दैवाने तळागाळातील असंख्य समाज बांधवांवर वैदिक पध्दतीचे संस्कार झाल्याने विश्वगुरू बसवण्णां यांचे कार्याविषयी माहिती , सर्वांच्या घरी, बुद्ध,बसवण्णां, फुले, शाहू, आंबेडकर यांची प्रतिमा, विभूती धारण,इष्टलिंग दीक्षा, दररोज इष्टलिंग पूजा पासून सुरू करून समाज जागृत करणे गरजेचे आहे. बहुसंख्य बांधवांना विश्वगुरू बसवण्णां यांचे फक्त प्रतिमा माहित असून समाज कार्य आणि स्थापन केलेल्या परिपूर्ण लिंगायत धर्माविषयी तुलनात्मक माहिती कमी आहे. म्हणून आज क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने संकल्प केला पाहिजे की बुद्ध, बसवना, फुले, शाहू, आंबेडकर यांचे कार्य हे आपल्याला प्रेरणादायी असल्यामुळे सातत्याने त्यासाठी थोडा वेळ दिला तर आपले जीवन आदर्श होऊन उंचावेल यात शंका नाही.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission