आर्णी - अनाचार आणि विषमता पेशवाईच्या राज्यात अत्युच्च पातळीवर पोहचली होती. सामान्य माणसाचे जगणे दुर्लभ झाले होते. सामान्य माणसाला जगण्याचे नैसर्गिक हक्क नाकारण्यात आले होते. म्हणून स्वाभिमान जीवंत ठेवण्यासाठी शूरवीर महारांनी इंग्रजांची साथ देऊन पेशवाई संपवली. हा संघर्ष सत्ता आणि संपत्तीसाठी नव्हे तर स्वसन्मानासाठी होता असे प्रतिपादन प्रशांत वंजारे यांनी केले. ते आणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आयोजित भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. भीमनगर युवा मंच द्वारे आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लीलाबाई भगत होत्या.
वंजारे म्हणाले देश आज भयंकर संकटात असून सामान्य माणूस सैरभैर झाला आहे. असहिष्णुता टोकदार झाली असून धर्मनिरपेक्षता धोक्यात आली आहे. काही मुठभर लोकांच्या हातात राजकीय आणि आर्थिक सत्ता केंद्रीत झाल्यामुळे सत्तेच्या विकेंद्रीकरणाला खो देण्यात आला आहे. म्हणून भारतीय संविधानाला अभिप्रेत असणारे कल्याणकारी राज्य पुन्हा प्रस्थापित करायचे असेल तर आपल्याला नवा संघर्ष उभा करावा लागेल.
यावेळी कवी विजय ढाले यांनी सुद्धा समयोचित विचार मांडले. संचालन अॅड. कमलेश खरतडे तर आभार प्रदर्शन विशाल मुरादे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदेश भगत, अॅड. सूरज भगत, जयराज मुनेश्वर, प्रसेनजीत पुनवटकर, चेतन इंगळे, राजेश खंडारे, प्रशिक मुनेर्श्वर, क्षितिज भगत, सुजित पाटील, सुधाकर गवई, आदींनी परिश्रम घेतले.
Satyashodhak, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan