डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मण + क्षत्रिय + वैश्यजातींना आरक्षण का नाकारले ? ( भाग - 5 )

- प्रा. श्रावण देवरे

ओबीसीनामा - आंबेडकरवाद भाग - 5 - प्रा. श्रावण देवरे

लांडगा आणी शेळ्यांची गोष्ट!

     देवा - धर्माच्या नावाने काही अतिरंजित भाकडकथा पसरवणारी एक खास यंत्रणा ब्राह्मणवादी छावणीत असते. हिटलरचा एक मंत्री जोसेफ गोबेल्स (1897-1945) याच्याकडे अशा भाकडकथा पसरविण्याचे खाते सोपविलेले होते. एखादी खोटी गोष्ट 100 वेळा वेगवेगळ्या पद्धतीने, वेगवेगळ्या लोकांनी, वेगवेगळ्या ठिकाणाहून सांगीतली की ती जनतेला खरी वाटायला लागते. ब्राह्मणी छावणीत असे असंख्य गोबेल्स गावपातळीपासून देशपातळीवर काम करीत असतात. बाबा महाराजांची फौज हा त्यातीलच एक भाग! अब्राह्मणी छावणीतही काही संघटना गोबेल्सचे काम करीत असतात. ‘छत्रपती शिवरायांचा राजाभिषेक करतांना गागाभट्टाने आपल्या पायाने टिळा लावला’, वगैरे अशा अनेक भाकडकथा खर्‍या कथा म्हणून पसरवल्या गेल्यात!

Not give reservation to Brahmin Kshatriya & Vaishyas - Dr Babasaheb Ambedkar     मराठा आरक्षणाचा विषय तापल्यानंतर एक भाकड कथा जाणीवपूर्वक पसरविण्यात आली. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार करतांना मराठा जातीच्या पुढार्‍यांना विचारले होते की, ‘‘तुमच्या मराठा जातीला आरक्षण हवे का?’’ तर त्यावेळी मराठ्यांनी स्पष्ट शब्दात सांगीतले की, ‘‘आम्ही काय म्हार-मांग आहोत काय, आरक्षण घ्यायला?’’ आता ही निव्वळ भाकडकथा आहे आणी रोज फेसबुकवर व व्हाटसपवर वाचायला मिळते.

     बाबासाहेबांनी आरक्षणासाठी दोन कॅटेगिरीच्या सूची तयार केल्यात. एक अस्पृश्य-दलित जातींची सूची, जीला शेड्युल कास्ट (SC) म्हटले जाते. व दुसरी आदिवासी कॅटेगिरीतील जमातींची सूची, जीला शेड्युल ट्राईब्ज (ST) म्हटले जाते. या याद्या तयार करतांना बाबासाहेब कोणत्याही जातीच्या पुढार्‍यांना ‘तुमची जात यादीत टाकू का?’ असे विचारायला गेले नाहीत. कारण इंग्रजांच्या काळात दर दहा वर्षांनी जातनिहाय जनगणना होत असल्याने जंगलात राहणार्‍या आदिवासी जातींची यादी व गावकुसाबाहेर राहणार्‍या अस्पृश्य जातींची यादी जे. एच. हटन यांनी 1931 साली तयारच करून ठेवलेली होती. 1935 चा एक्ट तयार करतांना मागास जातींना आरक्षण देण्यासाठी हीच यादी वापरण्यात आली व पुढे संविधान तयार करतांना बाबासाहेब आंबेडकरांनी हीच यादी थोडीफार सुधारणा करून संविधानात सूची म्हणून समाविष्ट केली.

     आता राहीला प्रश्न दलितेतर व आदिवासेतर जातीं-जमातींना आरक्षण देण्याचा! बाबासाहेबांनी या जातींमधून मागास जाती शोधून काढण्यासाठी स्वतंत्रपणे तज्ञांचा आयोग नेमण्याची सूचना घटनेच्या 340 व्या परिच्छेदात केली. हे काम तज्ञांच्या आयोगावर सोपविल्यानंतर बाबासाहेब असे एखाद्या जातीच्या पुढार्‍यांना का विचारतील की, ‘तुमच्या जातीला आरक्षण हवे का? पाहिजे असेल तर सांगा, घटनेत तरतुद करून लगेच तुमच्या जातीला आरक्षण देऊन देऊन टाकतो.’

     प्रतिनिधित्व किंवा आरक्षण हे दुर्बलांना सबल बनविण्यासाठी व सर्वांना एका समान पातळीवर आणण्यासाठी आहे, ही भुमिका सर्वांनी मान्य केल्यानेच संविधानात समाविष्ट करण्यात आली. त्यामुळे दुर्बलांना सबलांपासून वेगळे काढण्यात आले. सबल जाती दुर्बल जातीच्या यादीत येणार नाहीत, याची काटेकोर काळजी बाबासाहेबांनी संविधान बनवितांना घेतली. मुळात सबल जातीचे प्रत्येक क्षेत्रातील प्रतिनिधित्व त्यांच्या लोकसंख्येपेक्षा कितीतरी पटीने जास्त असल्याने त्यांना आरक्षण देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणी समजा एखाद्या सबल जातीला आरक्षण दिले तर त्या जातीच्या मेंदुतून जातवर्चस्वाचा माज कमी होणार आहे का? आरक्षणामुळे ती सबल जात अजून जास्त ताकदवान होईल व कनिष्ठ जातीचे अधिकाधिक शोषण करण्याचे बळ तीला मिळेल. यासाठी एक उदाहरण दिले तर हा मुद्दा नीट लक्षात येईल. आमच्या बहुजनांना उदाहरण दिल्याशिवाय समजत नाही, म्हणून उदाहरण देत आहे.

     जंगलात चरणार्‍या शेळ्यांच्या कळपावर रोज एक लांडगा हल्ला करीत होता व एक शेळी पकडून घेऊन जात होता. शेळ्या दुर्बल असल्याने स्वतःचे संरक्षण करण्यासाठी जास्त वेगाने धावू शकत नव्हत्या. ‘‘लांडग्याला गोळी घालून ठार करा’’ असा सल्ला शेतकर्‍याला देण्यात आला. परंतू शेतकरी लोकशाहीवादी असल्याने त्याने संवैधानिक मार्गाचा शोध घेतला.

     1) लांडग्याला ठार मारले तर जंगलात तणावाचे वातावरण तयार होईल व लांडग्याच्या पाठीशी जंगलचे सत्ताधारी असलेले वाघ व सिंह उभे आहेत. केवळ या सत्ताधार्‍यांच्या पाठींब्यामुळे हा लांडगा माजलेला आहे. क्रूर व रानटी लांडग्याला मारले तर, जंगलातील इतर रानटी व क्रूर प्राणी लांडग्याची बाजू घेतील व आपल्याला दहशतवादी-आतंकवादी ठरवून फासावर लटकावतील. त्यामुळे त्या शेतकर्‍याने लांडग्याला गोळी घालून ठार करण्याचा नक्षलवादी मार्ग स्वीकारला नाही.

     2) मग उरला लोकशाहीवादी संवैधानिक मार्ग! संवैधानिक मार्ग शोधण्यासाठी अभ्यास लागतो. म्हणून त्याने विचार करायला सुरूवात केली. त्याने स्वतःला पहिला प्रश्न विचारला, ‘मुळात आपल्या शेळ्या लांडग्याच्या तावडीत का सापडतात?’ कारण आपल्या शेळ्या स्वतःचे संरक्षण करण्यासाठी पळण्यात कमी पडतात. आपल्या शेळ्या धावण्यात का कमी पडतात? कारण आपण त्यांना जंगलातील कोरडा चारा खाऊ घालतो. सकस आहार नसल्याने त्या दुर्बळ राहतात व धावण्यात कमी पडतात. मग त्याने आपल्या शेळ्यांना सबळ बनविण्यासाठी हिरवा चारा देण्याचा विचार केला.

     3) शेतकरी आपल्या बागायती शेतीत खास हिरवा चारा देणारी पीके पेरू लागला. शेळ्यांना रोज हिरवा खुराक मिळायला लागल्यावर शेळ्यांमध्ये पळण्याचे बळ आले व त्या स्वतःचे संरक्षण करायला सक्षम बनल्या. शेळ्यांसाठी हिरवा चारा म्हणजे आरक्षणच! आरक्षण मिळायला लागल्यावर त्या सक्षम झाल्यात.

     4) ईकडे लांडग्याचा जळफळाट होऊ लागला. आधी शेळ्या सहज घावत होत्या. ‘‘बळी तो कान पीळी’’ या जंगली कायद्यान्वये त्याला शेळ्या मारण्याचा अधिकार मिळाला होता. रोज मांसाहारी जेवणाची मौजमस्ती तो करू शकत होता. मात्र नव्या लोकशाहीत दुर्बलांना संरक्षण देणार्‍या आरक्षणामुळे त्याचा अधिकार धोक्यात आलेला होता. कालपर्यंत ‘बे बे’ करीत प्राणाची भीख मागणार्‍या शेळ्या आज आरक्षणाचे हिरवे गवत खाऊन माजल्या आहेत. त्यांना धडा शिकविलाच पाहिजे, असा विचार घेऊन तो सत्ताधारी वाघ-सिंहाकडे गेला व म्हणाला की-

     ‘‘शेळ्यांना मिळत असलेले आरक्षण मलाही मिळाले पाहिजे.’’

     लांडग्याची ही मागणी ऐकूण वाघ-सिंहही चक्रावले. ते म्हणाले-

     ‘‘अरे त्या शेळ्या आहेत, तु लांडगा आहेस, तुमची कॅटेगिरी एकदम डिफरन्ट आहे. जरा विचार कर!’’

     ‘‘मी विचार करीत नसतो, कारण विचार करण्यासाठी अभ्यास करावा लागतो, वाचन करावे लागते. मी कधीच काही वाचत नाही व अभ्यासही करीत नाही. मला फक्त शेळ्यांचं आरक्षण पाहिजे! बस्स!’’ -लांडग्याने मोठमोठ्याने भोकांड पसरवलं, त्याच्या या भोकांडाने आख्खं जंगलच हादरलं! जंगलातले आमदार-खासदार-मंत्री-मुख्यमंत्री सगळे त्या लांडग्याला पाठींबा द्यायला धावले. क्रांतीकारी, पुरोगामी व प्रतिगामी म्हणविणारे सगळे कम्युनिस्ट, समाजवादी, गांधीवादी, भीडे-गुरूजीवादी, आंबेडकरवादी सर्वांनी आपापले तत्वज्ञान त्या लांडग्याच्या पायाशी अर्पण केले. सर्व पुरोगामी-प्रतिगामी नेते म्हणाले- ‘‘शेळ्यांचे नेते जातीयवादी आहेत, समाजात दंगलीचे वातावरण निर्माण करीत आहेत. गरीब बिचार्‍या लांडग्यांच्या लेकरांना उपाशी ठेवत आहेत. शेळ्यांच्या नेत्यांचा धिक्कार असो!’’ अशा घोषणा जंगलात दुमदुमु लागल्या!

     तरीपण वाघ-सिंहाने लांडग्याला समजावण्याचा प्रयत्न केला-

     ‘‘अरे त्या शेळ्यांना आरक्षणाच्या नावाखाली हिरवा चारा मिळतो. तो खायला तु तयार आहेस काय?’

     ‘‘होय, मी गवत खायला तयार आहे. त्या लायकी नसलेल्या शेळ्यांच्या पंक्तीत मी बसायला तयार आहे.’’ निर्लज्जपणे लांडगा उत्तरला.

     ‘‘पण तुला रोज हिरवा चारा कोण खाऊ घालेल?’’ वाघ-सिंह अधिकच गोंधळले.

     लांडगा धुर्तपणे म्हणाला- ‘‘तुम्ही जंगलचे राजे म्हणून असा फतवा काढा की, आजपासून लांडग्यांची कॅटेगिरी ‘शाकाहारी प्राणी’ म्हणून जाहीर करण्यात येत आहे. त्यामुळे लांडग्यांना शाकाहारी शेळ्यांच्या कळपात घुसण्याची परवानगी देण्यात येत आहे.’’

     झाले. लांडग्याची मागणी लगेच जी. आर. काढून अमलात आली. वाघ-सिंहाजवळ पर्यायच नव्हता, कारण सत्तेच्या राजकारणात लांडग्याचे स्थान अनन्य होते. शाकाहारी प्राण्यांवर जरब बसविण्यासाठी लांडग्याचा चांगलाच उपयोग होत होता. म्हणून त्याचे लाड वाघ-सिंहांना पुरविणे भाग होते.

     अशा प्रकारे लांडगे शेळ्यांच्या कॅटेगिरीत उजाड माथ्याने घुसलेत व चारा खाण्याच्या बहाण्याने एक-एक शेळी खाऊन फस्त करू लागलेत.

     ‘बळी तो कान पीळी’ ची रानटी जातीव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी आरक्षणाची खिराफत उच्चजातीयांना वाटली जात आहे. आधी शेळ्या पकडण्यासाठी धावपळ करावी लागत होती. आता शेळ्यांचं आरक्षण लांडग्यांनाही मिळायला लागल्यावर लांडगे सहजपणे शेळ्यांच्या कळपात (कॅटेगिरीत) घुसत होते व पाहिजे तेवढ्या शेळ्या मारून खाऊ शकत होते.

     जातीव्यवस्था नष्ट करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी जातीव्यवस्थेचे समर्थक असलेल्या ब्राह्मण+क्षत्रिय+वैश्य जातींना आरक्षणापासून लांब ठेवले. कारण त्यांना मागास दर्जा दिल्यावरही व आरक्षण दिल्यावरही त्यांची उच्चजातीय मानसिकता नष्ट होत नाही, उलट जात-वर्चस्वाची मानसिकता अधिक मजबूत होते. जरांगे एकीकडे मराठ्यांसाठी कुणबी आरक्षण मागतो, मात्र कुणबी हे लायकी नसलेले लोक आहेत, असेही म्हणतो. आरक्षण घेत असलेल्या दलित+आदिवासी+ओबीसी जाती लायक नसतात, असे जरांगे म्हणतो, तर मग लायकी नसलेल्या लोकांच्या पंक्तीत बळजबरी का घुसतो, असा साधा प्रश्न जरांगेला पाठींबा देणारे लोक विचारत नसतील तर हे पाठींबा देणारे लोक खरोखरच लायकी नसलेले आहेत.

     दलित + आदिवासी + ओबीसींना आरक्षण दिले तर ते जातीअंतासाठी लढतील व ब्राह्मण+क्षत्रिय+वैश्य यांना आरक्षण दिले तर ते अधिक जोमाने जातीव्यवस्था बळकट करण्यासाठी लढतील, हे साधे सूत्र बाबासाहेबांचे होते. पण आजकाल निवडणूकीच्या राजकारणात फुले-आंबेडकर कधीच गहाण पडलेले आहेत.

     तो पर्यंत जयजोती! जयभीम!! सत्य की जय हो!!!

-प्रा. श्रावण देवरे, संस्थापक-अध्यक्ष, ओबीसी राजकीय आघाडी, संपर्कः 94 227 88 546 ईमेलः obcpartys@gmail.com

Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Privacy Policy
Terms & Conditions

Our Other Youtube Channel & WebSites About Educationa & History

Discover You
Bharatiya
Discover Abhi
फुले, शाहू, और आंबेडकर की प्रेरणादायक विरासत की खोज करें, phuleshahuambedkar.com पर। सामाजिक सुधार, शिक्षा, और सशक्तिकरण में उनके योगदान को जानें। उन्होंने एक और समृद्ध भारत के रूप में आकार देने वाले ऐतिहासिक और विचारशील दृष्टिकोणों में गहराई में डूबे।

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209