डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मण + क्षत्रिय + वैश्यांना आरक्षण का नाकारले ?  ( भाग - 3 )

- प्रा. श्रावण देवरे 

ओबीसीनामा - 11 आंबेडकरवाद. भाग - 3 - प्रा. श्रावण देवरे

     लेखाच्या दुसर्‍या भागात आपण जातीव्यवस्थानिर्मिती करणारी मनुस्मृती व जातीव्यवस्था नष्ट करणारी भारतीय राज्यघटना या मुद्द्यापर्यंत आलो होतो. आता लेखाच्या तिसर्‍या भागात या दोन राज्यघटनांमधलं जातीयुद्ध अभ्यासू या!

Dr Babasaheb Ambedkar denied reservation to Brahmin Kshatriya Vaishyas     जातीनर्मिती व जातीव्यवस्था निर्मिती हा मुख्य उद्देश मनुस्मृतीचा होता. त्याप्रमाणे ब्राह्मण राजे व ब्राह्मण कारभार्‍यांच्या प्रभुत्वाखाली गेलेले सामंती क्षत्रिय राजे जे नंतरच्या काळात सामंती क्षत्रिय जाती म्हणून ओळखले गेलेत, या सर्वांनी मनुस्मृतीतील कायद्यांची कडक अमलबजावणी सुरू केली. ब्राह्मणवर्णातून ब्राह्मण जात उत्क्रांत सहजपणे झाली. परंतू बौद्धकाळात सामंत हा समाजघटक नव्हता. त्यामुळे महसूल गोळा करण्याचे काम राज्याने नेमलेले अधिकारी करीत होते. जातीनिर्मितीच्या प्रक्रियेत हे राजाधिकारी जातीत रूपांतरीत होत आनुवंशिक बनलेत. त्यातून गाव पाटील हे पद आनुवंशिक झाल्याने पाटील जातीत रूपांतरीत झाले. अनेक गावांचा मिळून जो महसूल विभाग निर्माण होई, त्याचा प्रमुख सामंत वा सरंजामदार झाला व तोही जातीत रूपांतरीत होऊन आनुवंशिक झाला.

     बौद्धकाळात मरणप्राय झालेल्या क्षत्रिय वर्णाला जातीव्यवस्थेने पुरूज्जीवीत केले व त्यातून मराठा, जाट, पटेल, ठाकूर अशा तथाकथित क्षत्रीय जाती निर्माण झाल्यात. ब्राह्मण पुरोहितांनी हिरण्यगर्भ संस्कार विधी करून या सामंतांना क्षत्रियजातीचा प्रतिष्ठीत दर्जा दिला. या जातींना नव्या ब्राह्मणी व्यवस्थेने विशेषाधिकार दिलेत. कारण कष्टकरी शेतकरी, उत्पादक व व्यावसायिक समाजघटक जातीत बंदिस्त करतांना बळाचा वापर करावा लागणार होता. मनुस्मृतीचे जातीव्यवस्थानिर्मितीचे कायदे गावपातळीपर्यंत कडक कारवाई करून अमलात आणण्यासाठी तथाकथित क्षत्रिय जातींचा वापर सामंती राजे व ब्राह्मण दरबार्‍यांनी केला. म्हणून क्षत्रिय जातींना विशेषाधिकार देऊन मुख्य सत्तेत सहभागी करून घतले गेले, त्यातून त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळाली व सशस्त्र खडे सैन्य ठेवण्याची परवानगी देउन गुंडगिरी व दहशतीच्या जोरावर जातीव्यवस्था निर्मितीचे मनुस्मृतीचे कायदे शेतकरी, उत्पादक, व्यावसायिकांवर लादण्यात आलेत. उत्तरभारतातील आजच्या जमीनदारांच्या करणीसेना व रणवीर सेना म्हणजे आधुनिक क्षत्रियजातींच्या गुंडगिरीचे व दहशतीचे जातीवंत उदाहरण होय! क्षत्रिय जातींच्या गुंडगिरीला व दहशतीला बळी पडणारे त्याकाळाचे सर्व शेतकरी व उत्पादक-व्यवसायिक आजच्या काळात ओबीसीजाती म्हणून ओळखल्या जातात. कुणबी, लोहार, सुतार, कुंभार, नाभिक, माळी, तेली, धनगर वगैरे किमान 350 जाती! या उत्पादक व्यावसायिक जातीतील मातंग, चर्मकारांसारख्या काही जातींना नंतर अस्पृश्य ठरवून गावकूसाबाहेर काढले.

     मनूने पुकारलेले हे एकतर्फी जातीयुद्धच होते. या युद्धात शेतकरी, उत्पादक व व्यावसायिक समाजघटकांनी प्रतिकार करू नये म्हणून त्यांना शूद्र हिन घोषित केले. जातीयुद्ध एकतर्फी राहील यासाठी शस्त्र बाळगण्याची परवानगी फक्त या तथाकथित क्षत्रिय जातींनाच देण्यात आली व शूद्रजातींना शस्त्रबंदी केली. शूद्रांनी शिक्षण घेतले तर ते राज्यकारभारात येतील किंवा स्वतःच्या व्यवसायाचा विकास करतील, शिक्षणातून शूद्रजातींमधून बुद्धीवादी वर्ग निर्माण होईल व तो आपली ब्राह्मणी षडयंत्रे उघड करील, या भीतीपोटी त्यांनी शुद्रजातींना शिक्षणबंदी केली. व्यवसायिक शूद्रजातींनी आपले उत्पादन इतर राज्यात किंवा इतर देशात जाउन विकून नफा कमवू नये म्हणून त्याला समुद्रबंदी व गावबंदी करण्यात आली. ब्राह्मणांनी मनूस्मृतीत शूद्रजातींवर धनसंचय बंदी लादली. कारण धनसंचयातून तो शस्त्र खरेदी करू शकतो व सशस्त्र बंड करू शकतो. आपल्या व्यवसायातील उत्पादित वस्तू विकून तो धनसंचय करू शकतो, याभीतीपोटी मनुस्मृतीने रोखीने खरेदी-विक्री बंद केली व गवाही पद्धत सुरू केली. विविध बंद्या आणून जातीनिर्मितीची व जातीव्यवस्था निर्मितीची प्रक्रिया ईसवी सन 1 पासून ईसवी 600 पर्यंत रात्रंदिवस अखंडपणे डोळ्यात तेल घालून चालू होती.

     ही एकतर्फी जातीयुद्धाची रचना बाबासाहेबांना निषिद्ध वाटली म्हणून त्यांनी मनुस्मृतीची होळी केली व राज्यघटनेत व्यक्तीस्वातंत्र्य देऊन या जातीयुद्धाला दुतर्फा करण्याचा प्रयत्न केला. संवैधानिक चौकटीत लोकशाही साच्यात हे जातीयुद्ध जातीसंघर्षात रुपांतरीत केले. जातीनिर्मितीच्या सर्व बंद्या लेखणीच्या एका फटकार्‍यानिशी बाबासाहेबांनी नष्ट केल्या. हा जातीसंघर्ष समानतेच्या पातळीवर आणण्यासाठी त्यांनी सर्वात मोठे शस्त्र दिले ते प्रतिनिधित्वाचे म्हणजे आरक्षणाचे! सार्वजनिक जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात दलित, ओबीसी व आदिवासी जाती-जमातींना सुरक्षित प्रतिनिधित्व देऊन लोकशाही चौकटीतील जातीविरोधी लढ्याला सक्षम केले.

बाबासाहेबांनी आरक्षण, एट्रॉसिटी एक्ट यासारखी शस्त्रे ही केवळ कनिष्ठ जातीयांनाच का दिलीत, ब्राह्मण+क्षत्रिय(मराठा)+वैश्य जातींना का दिली नाहीत, याचाही विचार आपण केला पाहिजे. समतेसाठीची लढाई जर लोकशाही मार्गानेच करायची असेल तर      शोषित-पिडीत जातींना विशेष साधने व संधी देउन सक्षम करण्याची गरज आहे, हे बाबासाहेबांनी घटनासमितीला व देशाला पटवून दिले. संविधान तयार झाल्यावर 25 नोव्हें 1949 रोजी संविधान समितीला उद्देशून बाबासाहेबांनी जे भाषण केले त्यात ते उच्चजातीय सत्ताधार्‍यांना ईशारा देतात की,

     ‘‘… How long shall we continue to deny equality in our social and economic life? …. We must remove this contradiction at the earliest possible moment or else those who suffer from inequality will blow up the structure of political democracy….’’ (जाड ठसा माझा) (Dr. Babasaheb Ambedkar, at Constituent Assembly, on 25th November 1948)

     ‘Blow up’ या शब्दाचा अर्थ Cambridge English Dictionary मध्ये पुढीलप्रमाणे दिलेला आहे- ‘to destroy something or kill someone with a bomb, or to be destroyed or killed by a bomb:’ म्हणजे बॉम्बसारख्या स्फोटक-विध्वंसक वस्तूचा उपयोग करून उध्वस्त करणे, राख-रांगोळी करणे किंवा खून करून मारून टाकणे, म्हणजे उघडपणे मैदानी युद्ध पुकारणे.’

     या संविधानाला अपेक्षित राजकीय समता, आर्थिक समता व समाजिक समता स्थापित झाली नाही तर शोषित-पिडित जनता ही राजकीय लोकशाही आक्रमकपणे हिंसक बनून उध्वस्त करतील.’’ बाबासाहेबांच्या ‘‘Blow up’’ या शब्दावरून हेच सिद्ध होते की त्यांनीही ‘जातीयुद्धाची शक्यता नव्हे तर खात्रीच’ गृहित धरली आहे.

     जातीव्यवस्था निर्माण करतांना ब्राह्मणांनी रानटी, हिंसक व क्रूर अशा क्षत्रिय जाती निर्माण केल्यात व त्यांनी निर्माण केलेल्या गुंडगिरीच्या दहशतीतून शूद्रादिअतिशूद्र वर्णातून अस्पृश्य जाती, व्यवसायिक शूद्रजाती, आदिवासी जमाती व भटक्या-विमुक्त जाती निर्माण केल्यात. जातीव्यवस्था नष्ट करतांना सर्वात जास्त क्रूर व रानटी विरोध क्षत्रिय जातींकडूनच होईल, हे बाबासाहेबांना माहित होते. रानटी व हिंसक क्षत्रिय जातींना सामोरे जाण्याची क्षमता दलित व आदिवासी यांच्यात नाही, कारण ते गावकुसाबाहेर आहेत व सर्व साधनांनी वंचित! गुंड, रानटी व हिंसक क्षत्रिय जातींशी समोरा-समोरची मैदानी लढाई लढण्याची क्षमता फक्त आणी फक्त ओबीसी जातींमध्येच आहे, हे बाबासाहेबांनी ओळखले होते. म्हणून बाबासाहेब ओबीसींना ‘झोपलेला सिंह’ म्हटलेले आहे. त्याला फक्त जागृत करायची गरज आहे. म्हणून बाबासाहेबांनी संविधानात विशेष असा 340 वा परिच्छेद टाकला.

     दलित व आदिवासी जाती गावकुसाबाहेर राहात असल्याने त्यांची जातींची सूची (SC and ST) करणे सोपे होते व ते काम बाबासाहेबांनी सहजपणे पार पाडले. परंतू ओबीसी जाती गावकुसात राहात असल्याने त्यांना काटेकोरपणे ब्राह्मणजात+क्षत्रियजाती+वैस्यजातींपासून वेगळे करणे व त्यांना आरक्षणासारखी विशेष साधने व संधी देणे हे एक फार मोठे अभ्यासाचे अवघड काम होते. कारण अनेक बाबतीत ओबीसी जाती व क्षत्रिय जाती यांच्यात साम्य आढळून येते. त्यामुळे ओबीसी जातींची सूची (OBC-Shedule) जातीप्रमाणे तयार करतांना चूकून एखादी क्षत्रियजात ओबीसी यादीत आली तर ती क्षत्रिय जात गुंडगिरी करून सत्तेच्या व दहशतीच्या जोरावर ओबीसींचे सर्व आरक्षण फस्त करेल, याबाबत बाबासाहेबांना खात्रीच होती. यामुळे जातीअंताचा जातीसंघर्ष सपशेल अयशस्वी होईल, ही भीती बाबासाहेबांना वाटत होतीच!

     शब्दमर्यादा ओलांडली जात असल्यामुळे मी आता येथे थांबत आहे. पुढील भागात प्रतिनिधित्वाचे-आरक्षणाचे शस्त्र हे फक्त जातीअंतासाठीच आहे, हे खरे असले तरी हे शस्त्र जातीव्यवस्था मजबूत करण्यासाठी वापरण्याचे षडयंत्र कसे रचले जात आहे व या षडयंत्रात क्षत्रिय जातींची काय सक्रिय भुमिका आहे, याची चर्चा चौथ्या व अंतिम भागात करू या!

     तो पर्यंत जयजोती! जयभीम!! सत्य की जय हो!!!

- प्रा. श्रावण देवरे, संस्थापक-अध्यक्ष, ओबीसी राजकीय आघाडी, संपर्कः 94 227 88 546 ईमेलः obcparty@gmail.com

Satyashodhak, obc, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission
Share on Twitter
Phule Shahu Ambedkar फुले - शाहू - आंबेडकर
Privacy Policy
Terms & Conditions

Our Other Youtube Channel & WebSites About Educationa & History

Discover You
Bharatiya
Discover Abhi
फुले, शाहू, और आंबेडकर की प्रेरणादायक विरासत की खोज करें, phuleshahuambedkar.com पर। सामाजिक सुधार, शिक्षा, और सशक्तिकरण में उनके योगदान को जानें। उन्होंने एक और समृद्ध भारत के रूप में आकार देने वाले ऐतिहासिक और विचारशील दृष्टिकोणों में गहराई में डूबे।

About Us

It is about Bahujan Samaj Books & news.

Thank you for your support!

इस वेबसाइट के ऊपर प्रकाशित हुए सभी लेखो, किताबो से यह वेबसाईट , वेबसाईट संचालक, संपादक मंडळ, सहमत होगा यह बात नही है. यहां पे प्रकाशीत हुवे सभी लेख, किताबे (पुस्‍तक ) लेखकों के निजी विचर है

Contact us

Abhijit Mohan Deshmane, mobile no 9011376209