- प्रा. श्रावण देवरे
या लेखाच्या पहिल्या भागात आपण अत्यंत महत्वाच्या मुद्द्यावर थांबलो होतो. शब्द-मर्यादा हा माझ्या पुढील फार मोठा प्रश्न बनलेला आहे. मोठा प्रदिर्घ लेख आमचा बहुजन समाज वाचतच नाही. त्यात आमचा एक मोठा-भाऊ टिव्ही वर स्पष्टपणे सांगतो की, ‘मी काही वाचत नाही, अभ्यासही करत नाही, मला कायदा-कानून काही माहित नाही, पण मला आरक्षण पाहिजेच, आणी ते ओबीसीतूनच पाहिजे!’ अशा परिस्थितीत लिहीणार्याने लिहायचे तरी कोणासाठी? हे वाचणार नाहीत, पण त्यांच्या गरीब मराठा लेकरांना ओबीसीतून आरक्षण मिळायला लागले, तर कदाचित ही लेकरं ओबीसी साहित्य कधीतरी वाचतील, या आशेपोटी लिहीत राहावे लागते. असो!
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू समाजरचनेचे मुख्य दोन व एकूण चार उपभाग पाडले आहेत. त्यातील पहिल्या मुख्य भागाच्या पहिल्या उपभागात ते अशा जातींना समाविष्ट करतात, ज्या जातींना जातीव्यवस्थेचा (शोषणाचा) लाभ मिळतो, आणी म्हणून या जाती सातत्याने जातीव्यवस्था जीवंत राहण्यासाठी व ती अधिक मजबुत करण्यासाठी सतत संघर्ष करीत असतात. या जाति डिफाईन करतांना त्यांनी जे काटेकोर व शास्त्रशूद्ध शब्द वापरले आहेत, त्यांचा अभ्यास करणे फार महत्वाचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा पहिला उपविभाग डिफाईन करतांना लिहीतात- ‘‘High Caste – Dvijas Traivarnikas – Caste evolved out of the three varnas, Brahmins, Kshatriyas, and Vaishyas.’’
उच्चजाती- द्वीज वर्ण- ब्राह्मण, क्षत्रिय, व वैश्य या तीन वर्णातून उत्क्रांत झालेल्या जाती. Evolved या शब्दाचा अर्थ शब्दकोषात ‘उत्क्रांत’ असा दिलेला आहे. ब्राह्मण वर्णातून ‘ब्राह्मण जात’ उत्क्रांत झाली, क्षत्रिय वर्णातून ‘मराठा, जाट, पटेल, ठाकूर, राजपूत ईत्यादि जाती निर्माण झालेल्या आहेत. वैश्य वर्णातून व्यापारी-बनिया जाती निर्माण झाल्या आहेत. आणी या सर्व जाती सत्ताधारी आहेत, असे बाबासाहेब स्पष्टपणे सांगतात. पहिल्या भागातील दुसरा उपविभाग शूद्र वर्णातून निघालेल्या जाती आहेत, ज्यांना आज आपण ओबीसी (SEBC) म्हणून ओळखतो. तिसरा उपविभाग हा भटके-गुन्हेगार जाती-जमाती व आदिवासी जमातींचा आहेत तर चौथा उपविभाग अस्पृश्य जातींचा आहे. बाबासाहेबांनी याचे वर्गीकरण SC, ST, व OBC असे केले. या तिन्ही उपविभागातील जाती व जमाती जातीव्यवस्थेने शोषित-शासित असल्याने त्या स्वाभाविकपणे एकमेकांचे दोस्त बनू शकतात, असे बाबासाहेब सांगतात. परंतू ‘श्रेणीबद्ध उतरंडीची असमानता’ (Graded Inequality) असल्यामुळे ते एकमेकांचे मित्र बनण्याऐवजी शत्रूच बनलेले आहेत, असेही त्यांनी लिहीलेले आहे.
ब्राह्मणेतर चळवळीने व कम्युनिस्ट चळवळीने यांना एकत्रितपणे संघटित करून त्यांना दोस्त बनविण्याचा प्रयत्न केला परंतू याकामात त्यांना अपयशच पदरी पडले, असे बाबासाहेब लिहीतात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाच्या (प्रतिनिधित्वाची) रचना करण्याच्या सोयीसाठी SC, ST, OBC, व Open अशा चार कॅटेगिरी तयार केल्या. परंतू त्यांनी जो उपरोक्त तक्ता तयार केला त्यात ते स्पष्टपणे जातीसमर्थक व जातीविरोधक अशा दोन छावण्या अपेक्षित करतात. म्हणजे ही एक प्रकारची जातीसंघर्षाची नवी उच्चतर मांडणी आहे. श्रेणीबद्ध उतरंडीच्या असमानतेत चाललेला जातीसंघर्ष हा प्रत्येक जातीला दुसर्या जातीपासून वेगळा ठेवत होता. परंतू आरक्षनाच्या समान हितसंबंधातून SC कॅटेगिरील जाती संघटित होतील, ST जमाती संघटित होतील व ओबीसी जातीही संघटित होतील. अशा प्रकारे जातीविरोधी अब्राह्मणी छावणी मूर्त स्वरूप धारण करेल, ही बाबासाहेबांची अपेक्षा काही प्रमाणात यशस्वी होतांना दिसते आहे.
जातिव्यवस्था निर्माण करतांना मनूने ज्या ज्या उपाययोजना केल्यात व तथाकथित क्षत्रिय सामंती राज्यांकडून त्या राबवून घेतल्यात, त्या सर्व उपाययोजना जातीव्यवस्था जीवंत ठेवण्यासाठी व मजबूत करण्यासाठी आजही जातीसमर्थक सत्ताधारी ब्राह्मणी छावणी अमलात आणीत असते. अशा परीस्थितीत जातीसमर्थक ब्राह्मणी छावणी व जातीविरोधी अब्राह्मणी छावणी यांच्यात लोकशाही चौकटीतील जातीसंघर्ष नियंत्रित करणारी राज्यघटना बनवण्याची जबाबदारी डॉ. बाबासाहेबांवर आली व त्यांनी ती समर्थपणे पार पाडली.
समता व सुसंपन्नता या दोन्ही बाबी हातात हात घालूनच येत असतात व जात असतात. तुलनात्मक समता आली की उत्पादक-कष्टकरी वर्ग अधिक जोमाने व तनमनधनाने काम करतो. त्यातून उत्पादन वाढते व अर्थव्यवस्था भरभराटीला येते. बळीचे राज्य सुसंपन्न होते कारण त्याच्या राज्यात समता होती, असे आपल्याला तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले सांगतात. बौद्ध क्रांतीने आणलेल्या समतावादी विचार-प्रबोधनातून गुलाम मुक्त झालेत व ते अधिक जोमाने उत्पादन करू लागलेत. त्यामुळे पश्चिमेकडील देशांच्या बाजारपेठा भारतीय उत्पादकांनी काबीज केल्या. बौद्धकाळात अर्थव्यवस्था भरभराटीला आली. उत्पादक-कष्टकरीवर्ग सुसंपन्न असला तर राजसत्तेवर त्याची पकड असते. अशा परिस्थितीत समाजातील ऐतखाऊ वर्ग निष्प्रभ होत असतो व त्याचे समाजिक, राजकीय वर्चस्व खतम होत असते.
बौद्ध क्रांतीत ऐतखाऊ ब्राह्मण व गुंड-दहशतवादी क्षत्रिय वर्णाचे वर्चस्व नष्ट झाले होते. ते पुन्हा निर्माण करण्यासाठी पुष्यमित्रशृंगाने बौद्ध राजा बृहद्रथची हत्या केली व ब्राह्मणी सत्तेची पुनर्स्थापना केली. त्याच्यापासून प्रेरणा घेऊन देशभरातील ब्राह्मण राजे, ब्राह्मण कारभारी व ब्राह्मण पुजारी कामाला लागलेत. बौद्ध भिक्खूंची कत्तल सुरू केल्याने ते पराभूत मानसिकतेत गेलेत. परिणामी तत्कालीन सामंती राज्यांवर भिक्खूंचे वर्चस्व नष्ट होऊन ब्राह्मणांचे वर्चस्व निर्माण झाले. ब्राह्मणांच्या वर्चस्वाखाली आलेल्या राज्यांना एक समान कार्यक्रम देण्यासाठी मनुस्मृतीची निर्मिती करण्यात आली.
मनुस्मृतीचा एकच उद्देश होता- तो म्हणजे जातींची निर्मिती करणे, त्या जातींना एकाच जातीव्यवस्थेत संघटित करण्यासाठीचे कायदे तयार करणे व त्या कायद्यांची कडक अमलबजावणी कशी करायची यासंबंधीचे मार्गदर्शन करणे! जातीव्यवस्थेची निर्मिती करतांना मनुने ‘जातीयुद्ध’ गृहितच धरले होते. कारण कोणत्याही विषम व्यवस्थेत शोषित-शासित समाजघटक हा अन्यायाच्या विरोधात बंड करणारच, हा नैसर्गिक नियम आहे. त्यामुळे मनुने जातीनिर्मिती म्हणजे जातीयुद्धच हे गृहित धरले होते.
हे जातीयुद्ध एकतर्फी कसे राहील यासाठी मनुने काय काय तरतुदी मनुस्मृतीत केल्यात व बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान तयार करतांना हे एकतर्फी जातीयुद्ध लोकशाही चौकटीत दुतर्फा कसे बनवतले, या सगळ्या मुद्दयांची चर्चा आपण तिसर्या व शेवटच्या भागात करणार आहोत.
तो पर्यंत जयजोती! जयभीम!! सत्य की जय हो!!!
-प्रा. श्रावण देवरे, संस्थापक-अध्यक्ष, ओबीसी राजकीय आघाडी, संपर्कः 94 227 88 546 ईमेलः obcparty@gmail.com
1) पुढील तक्ता ‘‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर राईटिंग्ज एन्ड स्पीचेस’’ खंड 5 वा, पान-112 मधून घेतलेला आहे.
Satyashodhak, obc, Mahatma phule, dr Babasaheb Ambedkar, Bahujan, Mandal commission